Hatkanangale Lok Sabha Result 2024: एकनाथ धावले, धैर्यशीलना पावले

By भीमगोंड देसाई | Published: June 5, 2024 04:51 PM2024-06-05T16:51:36+5:302024-06-05T16:53:26+5:30

भीमगोंड देसाई कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंगळवारी शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी १३ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला. ...

due to the addition made by Chief Minister Eknath Shinde Dharishsheel Mane won In Hatkanangle Lok Sabha Constituency | Hatkanangale Lok Sabha Result 2024: एकनाथ धावले, धैर्यशीलना पावले

Hatkanangale Lok Sabha Result 2024: एकनाथ धावले, धैर्यशीलना पावले

भीमगोंड देसाई

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंगळवारी शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी १३ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला. उद्धवसेनेचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांना त्यांनी १५ व्या फेरीनंतर पिछाडीवर टाकत शेवटपर्यंत आघाडी कायम राखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना नामुष्कीजनक पराभव पत्कारावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या जोडण्या माने यांना गुलाल लावून गेल्या. मोदी फॅक्टर, इचलकरंजीत झालेले मतांचे धुव्रीकरण, शाहूवाडी, शिराळ्याने सत्यजित यांना दिलेले कमी मताधिक्य आणि वंचितने घेतलेली तीस हजारांवर मते ही माने यांच्या विजयास कारणीभूत ठरली.

माने यांना ५ लाख २० हजार १९०, सत्यजित पाटील यांना ५ लाख ६ हजार ७९१ शेट्टी यांना १ लाख ७९ हजार ८५० तर वंचितच्या डी.सी. पाटील यांना ३२ हजार ६९६ मते मिळाली. एकूण २७ उमेदवार रिंगणात होते. शेट्टी यांच्यासह २५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सुरुवातीपासून आघाडी असल्याने सत्यजित पाटील हेच विजयी होतील, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. मात्र १५ व्या फेरीनंतर ते मागे पडल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमोजणीच्या ठिकाणी सन्नाटा निर्माण झाला. या उलट माने यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सायंकाळी उशिरा निकाल जाहीर केला.

राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता १४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतमोजणीनंतर ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात झाली. एक फेरी ५७ हजार ते ६२ हजार मतांची होती. पहिल्या फेरीची मोजणी झाल्यानंतर निवडणूक यंत्रणेला ५९ ते ६० मतांची फेरी जुळत नव्हती. परिणामी पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. त्यानंतरही मतमोजणीनंतर मतांची अंतिम बेरीज करण्यास उशीर होत राहिला. मतमोजणीची प्रक्रिया रेंगाळत राहिली. उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून आलेल्या आकडेवारीपेक्षा प्रशासन तीन ते चार फेरीपर्यंत शेवटपर्यंत मागे राहिले. उमेदवारांचे प्रतिनिधी आधी कोण आघाडीवर आहे हे उघड करीत होते. त्यानंतर प्रशासन जाहीर करीत होते. परिणामी उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे निकाल समजून घेण्यासाठी गर्दी होत राहिली.

शेट्टी पहिल्या फेरीपासून पिछाडीवर राहिले. त्यांचे समर्थक आणि प्रतिनिधींनी नाराज होत निघून जाणे पसंत केले. उद्धवसेनेचे पाटील यांची आघाडी १५ व्या फेरीपर्यंत ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० इतकी होती. पण पन्हाळा, पेठवडगाव, हातकणंगले या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर माने यांना पाटील यांच्यापेक्षा १२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य १६ व्या फेरीत ७ हजारांवर गेले. शेवटपर्यंत पाटील यांना माने यांचे मताधिक्य कमी करता आले नाही. माने यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झाली. ती शेवटपर्यंत राहिली. माने समर्थकांनी जल्लोष सुरू केला. पाटील समर्थक नाराज झाले. या मतदारसंघात ६ लाख ७८ हजार ५९० पुरुष, ६ लाख ११ हजार ४५३ महिलांनी असे एकत्रित १२ लाख ९ हजार ७३ मतदारांनी (७१.११ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता.

विस्कळीत नियोजन

मतमोजणीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवणाच्या व्यवस्थेत प्रचंड विस्कळीतपणा होता. दुपारनंतर मतमोजणीच्या परिसरात पिण्याचे पाणीही पुरेसे नव्हते. जेवणासाठी अक्षरश: कर्मचारी, पोलिसांमध्ये ढकलाढकली झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे हे स्वत: जेवण सुरू करा, मतमोजणी कर्मचाऱ्यांना जागेवरच फूड पॅकेट आणून द्या, असे माइकवरून आवाहन करीत होते. जेवणाचे काटेकोरपणे नियोजन न केल्याने जेवणात वेळ गेला. दुपारी मतमोजणी रेंगाळली.

उमेदवारांची संख्या अधिक असल्याने नोटासह २८ उमेदवार रिंगणात होते. यामुळे मतमोजणी करताना प्रत्येक उमेदवारास किती मते पडली, याची नोंद करणे, शेवटी केंद्रात झालेले एकूण मतदान आणि मोजलेले मतदान यांचा मेळ घालताना मतमोजणी कर्मचारी मेटाकुटीस येत राहिले. यामुळेही फेरीनिहाय मतमोजणीची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यास विलंब लागत होता.

जयसिंगपुरातील एका केंद्रातील मतमोजणीवेळी वाद

जयसिंगपूरमधील काडगे मळा परिसरातील एका केंद्राचे मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रतिनिधी आणि मतमोजणी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. कंट्रोलचे युनिटवरील नंबर आणि फॉर्म नंबर १७ सी अर्जावरील नंबर एक नव्हता. वेगवेगळे नंबर आहे, असा आक्षेप प्रतिनिधींनी केला. यामुळे शेवटी या केंद्रावरील व्हीव्हीपॅटवरील मते मोजण्याचा निर्णय झाला. पुढील मतमोजणी सुरळीत झाली.

Web Title: due to the addition made by Chief Minister Eknath Shinde Dharishsheel Mane won In Hatkanangle Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.