समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा

By भीमगोंड देसाई | Published: July 13, 2024 01:11 PM2024-07-13T13:11:20+5:302024-07-13T13:13:09+5:30

एकाचवेळी काम सुरू केल्याने चिखल, खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त : मृत्यूचा बनला सापळा, प्रवास बनला धोकादायक

Due to the construction of the Kolhapur-Amba highway travel became dangerous due to dust in summer and mud in rain | समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा

कोल्हापूर ते आंबा या चौपदरीकरणाचे काम बोरपाडळे घाटाजवळ असे आहे. घाटात मोठा पूल असल्याने अनेक ठिकाणी खोदाई केली आहे. (फोटो : नसीर अत्तार)

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरणाचे काम २०२३ पासून सुरू आहे. सांगलीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. पण त्यापुढे आंब्यापर्यंतच्या कामाला अपेक्षित गती नाही. सर्वत्र एकाचवेळी उकरल्याने उन्हाळ्यात धूळ तर आता चिखलांनी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कोकणाला जोडणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने अवजडसह सर्वच वाहनधारक, दुचाकींची २४ तास वर्दळ असते. म्हणून महामार्ग कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची सद्यस्थिती, काम कधी पूर्ण होणार, कामाची गती संथ असल्याने होणारा त्रास, वाहनधारकांना होणारा त्रास यावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे होत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील आंबा ते कोल्हापूरपर्यंत चौपदरीकरणाचे काम एकाचवेळी सुरू केल्याने काम गतीने होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी महामार्गाची वाट बिकट बनली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने करवीर तालुक्यातील केर्ले ते आंब्यापर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. शेतवाडीतील रस्त्याप्रमाणे त्याची स्थिती असल्याने वाहनधारकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोकण ते विदर्भ असा प्रवास गतीने होण्यासाठी नागपूर-रत्नागिरी असा चौपदरीकरणाचा महामार्ग मंजूर केला. सांगलीपर्यंतचा महामार्ग तयार आहे. सांगलीपासून अंकलीपूल, चोकाक ते आंब्यापर्यंतच्या कामाची वाट लागल्याच्या तक्रारी आहेत. अंकली ते चौकाकपर्यंत अजूनही बाधित शेतकऱ्यांना भरपाईचा प्रश्न प्रलंबित आहे. भू-संपादनच नसल्याने या टप्प्यातील काम बंद आहे. तेथून कोल्हापूर ते पन्हाळा रोडवरील केर्ले गावापासून ते आंब्यापर्यंत महामार्गाचे काम एक वर्षापासून सुरू आहे. हे काम करताना टप्याटप्याने पूर्ण न करता एकाचवेळी सर्व ठिकाणी काम केले जात आहे.

पूर्वीचा वळणाच्या रस्त्याला पर्यायी महामार्ग करून शक्य तितक्या सरळ रेषेत करण्यासाठी प्रचंड सपाटीकरण, डोंगर कापले जात आहेत. आवश्यक त्या ठिकाणी पूल बांधले जात आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने शाहूवाडी तालुक्यात बहुतांशी ठिकाणचे काम बंद आहे. करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील काम केले जात आहे. या कामालाही गती नसल्याने मृत्यूच्या सापळ्यातून वाहन चालवण्याचा अनुभव वाहन चालकांना घ्यावा लागत आहे.

महामार्ग कसा आहे ?

सांगली, अंकलीपूल चोकाक, शिये, भुये, केर्ले, पडवळवाडी, केर्ली, बोरपाडळी, नावली, देवाळे, पैजारवाडी, आवळी, डोणोली, बांबवडे, शाहूवाडी, चांदोली, आंबा.

पूर्णपणे काम कुठपर्यंत झाले आहे ?

नागपूर - रत्नागिरी चौपदरीकरणाच्या कामाला सन २०२३ मध्ये सुरूवात झाली. सध्या नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. सांगलीपासून अंकली पूल ते आंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर ते आंबा महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. उन्हाळ्यात वाहनधारकांना धुळ्याचा आणि आता चिखलाचा त्रास होत आहे. छोटे, मोठे अपघात होत आहे. अवजड वाहने घसरून पलटी होत आहेत. म्हणून रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे. - तुकाराम पाटील, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, वाहनधारक
 

कोल्हापूर ते आंब्यापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी २०२५ पर्यंत मुदत आहे. या मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्यास ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई होईल. सद्य स्थितीमध्ये अपेक्षित गतीने काम होत आहे. - गोविंद, उप व्यवस्थापक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर

 

  • महामार्गाची मंजुरी : सन २०२२
  • प्रत्यक्ष कामाला सुरूवात : २०२३
  • एकूण निधी मंजूर : ५६९८ कोटी
  • कोल्हापूर आंब्यापर्यंतच्या रस्त्यास निधी :३९२४ कोटी

Web Title: Due to the construction of the Kolhapur-Amba highway travel became dangerous due to dust in summer and mud in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.