गणेशाच्या चरणी मानवतेची सेवा; ब्रेन स्ट्रोकने पत्नीचे निधन, अवयवदानाच्या निर्णयामुळे तीन रुग्णांना मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:41 PM2022-09-01T12:41:01+5:302022-09-01T12:41:30+5:30
गणेशचतुर्थीला सगळीकडे जल्लोषात गणपती बाप्पांची पूजा केली जात असताना राणी मगदूम यांच्या माध्यमातून देवाच्या चरणी मानवतेची सेवा वाहत केलेल्या या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले.
कोल्हापूर : सांगरूळमधील मगदूम हे सर्वसामान्य कुटुंब, नवरा पेट्रोल पंपावर कामाला, पत्नी गृहिणी, अचानक पत्नीला ब्रेन स्ट्रोक बसला आणि ब्रेन डेड होऊन त्या कोमात गेल्या. नियतीपुढे डॉक्टरांनीही हात टेकले. आपली पत्नी आता सोबत नसेल पण अवयवांच्या रूपाने ती कायम या जगात राहील, या उदात्त माणुसकीच्या हेतूने पती विलास मगदूम यांनी पत्नी राणी (वय ४०) यांचे दोन किडनी आणि लिव्हर दान केले. गणेशचतुर्थीला सगळीकडे जल्लोषात गणपती बाप्पांची पूजा केली जात असताना राणी मगदूम यांच्या माध्यमातून देवाच्या चरणी मानवतेची सेवा वाहत केलेल्या या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले.
विलास मगदूम हे पेट्रोलपंपावर कामाला आहेत, तुटपुंजा पगार असल्याने दूध व्यवसायाच्या माध्यमातून राणी या संसाराला हातभार लावत होत्या. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये. मात्र, सोमवारची सकाळ त्यांच्यासाठी काही वेगळेच घेऊन आली होती, घरात गणेशोत्सवाची तयारी सुरू होती. राणी नेहमीप्रमाणे जनावरांचे दूध काढून घरी आल्या, जेवण करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या गावातील खासगी दवाखान्यात गेल्या. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांना जोराचा झटका आल्याने कोल्हापूरला खासगी रुग्णालयात हलवल्यानंतर ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे त्यांच्या मेंदूसभोवती गाठी झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले.
ऑपरेशन करता येत नव्हते, औषधोपचाराने गाठी विरघळण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. पत्नी आता या जगात राहिली नाही हे ऐकताच विलास मगदूम यांनी हंबरडा फोडला. पण या परिस्थितीतही त्यांनी अवयवांची गरज असलेल्या रुग्णांचा विचार केला, पत्नी अवयवरूपाने कायम या जगात राहील हा धीरोदात्त निर्णय घेत त्यांनी व भाऊ सर्जेराव व पुतणे मच्छिंद्र यांनी राणी यांचे दोन किडनी आणि यकृत दान केले. त्यानुसार मंगळवारी सकाळी लिव्हर पुण्यातील रूबी हॉस्पिटल येथे, एक किडनी सोलापूर येथील गरजूंसाठी ग्रीन कॉरिडॉर करून पाठवण्यात आली. तर एक किडनी कोल्हापुरातीलच एका रुग्णाला बसवण्यात आली.
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी केले अभिवादन
मृतदेह घरी नेताना रुग्णालयाच्या बाहेर त्यांचे सगळे कर्मचारी उभे होते. सगळ्यांनी पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
नाईट लँडिंगची सोय असती तर...
आपल्या पत्नीचे हदय दुसऱ्याच्या शरीरात कायम जिवंत रहावे, अशी विलास यांची इच्छा होती. मात्र हदय काढून त्याचे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया चार तासात व्हावी लागते. हृदयाची मागणी परराज्यातून मागणी होती. त्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स लागणार होते आणि कोल्हापुरात नाईट लँडिंगची गरज होती. ते नसल्याने हृदय दान करता आले नाही.
मगदूम कुटुंबावर मोठा आघात होऊनही त्यांनी दाखवलेल्या दातृत्वाला मोल नाही. गणेशोत्सवाच्या दिवशी त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला, पण त्यांनी जे काम केले हे शंभर गणपतींच्या पूजेपेक्षाही अधिक आहे. - डॉ. विलास नाईक