अमेरिकेतील अनिवासी भारतीयांना डोनाल्ड ट्रम्पचा धक्का, ग्रीन कार्डच्या स्वप्नांचा चक्काचूर; कोल्हापुरातील किती नागरिक..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:20 IST2025-01-22T15:54:38+5:302025-01-22T16:20:42+5:30
पोपट पवार कोल्हापूर : भारतात शिक्षण घेऊन सुखाचे दिवस अनुभवण्यासाठी छानपैकी अमेरिकेतील नोकरी पत्करायची, तिथेच संसार थाटला की त्या ...

अमेरिकेतील अनिवासी भारतीयांना डोनाल्ड ट्रम्पचा धक्का, ग्रीन कार्डच्या स्वप्नांचा चक्काचूर; कोल्हापुरातील किती नागरिक..वाचा
पोपट पवार
कोल्हापूर : भारतात शिक्षण घेऊन सुखाचे दिवस अनुभवण्यासाठी छानपैकी अमेरिकेतील नोकरी पत्करायची, तिथेच संसार थाटला की त्या भूमीवर जन्मलेल्या पुढच्या पिढ्यांनाही आपोआप अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. त्यामुळे ‘अनिवासी भारतीय’ म्हणून कायमचेच अमेरिकेत राहणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारांवर व्यक्ती अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. मात्र, अमेरिकेच्या प्रेमात असणाऱ्यांना आता पुढच्या काळात अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही.
नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच अमेरिकन भूमीवर इतर देशांतील दाम्पत्यांच्या पाेटी जन्माला येणाऱ्या बाळाचे जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणले आहे. त्याचा मोठा फटका भारतीयांना बसणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचे परिणाम कोल्हापूरकरांनाही बसणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारांवर नागरिक अमेरिकेत स्थायिक आहेत. अमेरिकेतील आयटी, बँकिंग क्षेत्रात कोल्हापुरातील नागरिकांनी जम बसविला आहे. सध्या त्यांची दुसरी, तिसरी पिढी तेथेच स्थायिक झाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या पुढच्या पिढीला मात्र थेट भारतात येण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
पूर्वी, अमेरिकेत नोकरीसाठी येऊन स्थायिक झालेल्या दाम्पत्याला बाळ झाले तर त्याला कायद्याने अमेरिकेचे कायमचे नागरिकत्व मिळत होते. या निर्णयामुळे भारतीयांच्या तीन-चार पिढ्या तेथेच स्थिरस्थावर झाल्या. मात्र, ट्रम्प यांनी हे कायमचे नागरिकत्व देण्याचा कायदाच रद्द केला. त्यामुळे आता तेथे जन्मलेल्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. परिणामी, त्या कुटुंबांना परत भारतात यावे लागणार आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे काय होणार
तात्पुरता वर्क व्हिसा, विद्यार्थी, पर्यटक व्हिसाधारकांनी जन्म दिलेल्या बालकांना आता थेट अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. पूर्वी अशा व्हिसाधारकांनी अमेरिकेच्या भूमीवर जन्म दिलेल्या बालकांना त्यांचे नागरिकत्व देण्यात येत होते.
दृष्टीक्षेपात
- अमेरिकेत स्थायिक झालेले कोल्हापूरकर : १०००
- कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक : आयटी, बँकिंग
भारतीय नागरिक कष्टाळू आहे. तो प्रामाणिक आहे. अमेरिकेतील लोक सहा तासांच्यावर काम करू शकत नाहीत भारतीय लाेक चौदा-चौदा तास काम करू शकतात. त्यामुळे ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाने अमेरिकेचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांना हा निर्णय बदलावा लागेल. - मनीषा जोशी, अध्यक्ष, एनआरआय-नॉन रेसिडन्ट इंडियन असोसिएशन कोल्हापूर.