उसाला तुरा, वजनाला मारा, शेतकऱ्यांवर अडचणींचा फेरा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 'इतक्या' टक्क्यांपर्यंत घट
By राजाराम लोंढे | Published: January 2, 2023 04:04 PM2023-01-02T16:04:52+5:302023-01-02T16:05:19+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : उसाला यंदा लवकर फुलोरा आल्याने वजनात मोठी घट होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण १०, तर मराठवाड्यात हेच २५ टक्क्यांपर्यंत राहिले आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ही तफावत दिसत असून, सर्वच कारखान्यांची उद्दिष्ट गाठताना दमछाक होणार आहे.
राज्यात मागील हंगामात राज्यात १४ कोटी टन गाळप झाले होते. यंदा त्यापेक्षा अधिक होईल, असा ठोकताळा कारखान्यांचा होता. मात्र, उसाच्या वजनात घट होत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत एकरी पाच ते सात टन ऊस कमी मिळत आहे. हेच प्रमाण मराठवाड्यात अधिक असून, २५ ते ३० टक्के घट दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते.
वाढीच्या वेळीच धुवादार पाऊस
उसाची वाढ ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत गतीने होते. सप्टेंबरमध्ये कडक ऊन पडल्याने वाढ जोमात होते. मात्र, यंदा जोरदार पाऊस झाला. त्यात परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिल्याने उसाची वाढच खुंटल्याने त्याचा परिणाम वजनात दिसत आहे.
राज्यात खोडवा ऊस अधिक
राज्यात यंदा खोडव्याच्या उसाचे पीक तुलनेत अधिक असल्याने सरासरी २५ ते ३० लाख टन उसाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे.
तुरा लवकर येणारे वाण
को ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशिरा येतो.
तुरा का येतो :
- शेतामध्ये पाणी साठून राहणे.
- पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता.
काय करावे :
- पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण देणे.
- पॅराक्वाट या रसायनाची फवारणी.
- भरणीच्या वेळी फवारणी केली तर अधिक फायदा.
- उसाच्या शेंड्याजवळील पाने पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात काढणे.
सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे किमान १० टक्के गाळप कमी होऊ शकते. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ.
खतांचे वाढलेले दर आणि मजुरांची वानवा पाहता, उसाचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. वजन घटीने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. - ज्योतिराम खाडे, शेतकरी.