गुऱ्हाळघर म्हणजे ‘लग्नाचा खर्च गोंधळावर’, गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:36 PM2023-01-02T17:36:42+5:302023-01-02T17:38:47+5:30
कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूत
राजाराम लोंढे
कोल्हापूर : गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख आहे. मात्र अस्थिर दर, मजुरांची वानवा आणि इतर जिल्ह्यातील गुळाच्या अतिक्रमणामुळे येथील व्यवसाय अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या पटीत दर मिळत नाही, ‘गुऱ्हाळघर म्हणजे लग्नाचा खर्च गोंधळावर’ असाच प्रकार असल्याने यंदा अनेकांनी गुऱ्हाळघरे बंद ठेवली आहेत.
‘कोल्हापुरी गुळाने साता समुद्रापार भुरळ पाडली आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुळाची निर्मिती व्हायची, मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांत साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि शेतकरी त्याकडे वळला. काही तालुक्यांत गुऱ्हाळघरे तरीही तग धरून होती. मात्र उसाचा दर कायद्याच्या चाकोऱ्यात आला आणि शेतकऱ्यांना कारखान्याकडील पैशाची हमी मिळाली आणि गुऱ्हाळघरांच्या चिमण्या हळूहळू कमी होत गेल्या.
गेल्या तीन-चार वर्षांत उसाचा दर सरासरी तीन हजारांपर्यंत राहिला. त्या तुलनेत गुळाला भाव मिळत नसल्याचा परिणाम गूळनिर्मितीवर दिसत आहे. कोल्हापूर बाजार समितीत तुलनात्मक पाहिले तर स्थानिक गुळाची आवक वर्षाला कमी होत चालली आहे. मात्र बाहेरील गुळाची आवक वाढत आहे.
कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूत
जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू आहे. त्यातून उसाची पळवापळवी होते, त्यात यंदा कारखान्यांचा ऊस दर सरासरी तीन हजार प्रतिटन असल्याने शेतकऱ्यांचा गुऱ्हाळघरांकडील ओढा कमी झाला आहे.
उत्पादन खर्च दुप्पट, दर तेवढाच
गेल्या चार वर्षांत घाऊक बाजारात गुळाचा दर जवळपास स्थिर राहिला आहे. दर प्रतिक्विंटल ३२०० ते ४४९० रुपयांपर्यंत राहिला आहे. मात्र गुळाचा उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने हा व्यवसाय खऱ्या अर्थाने आतबट्ट्यात आला आहे.
तुलनात्मक कोल्हापूर बाजार समितीतील गुळाचा दर, प्रतिक्विंटल
वर्ष - आवक रवे - किमान - कमाल दर
२०२० - १७,२४२ - ३१०९ - ४४९०
२०२१ - १८,४१५ - ३२०५ - ४३७०
२०२२ - २०,२३० - २७०० - ४३२०
२०२३ - १७,१७० - ३५०० - ४१९०
गुळाचा कमाल दर ४ हजारांच्या वर दिसतो, मात्र तो किती शेतकऱ्यांना मिळतो, हेही महत्त्वाचे आहे. सरासरी ३५०० रुपये दर मिळतो, त्यातच गूळ व्यवसायाबाबत शासन उदासीन असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. - शिवाजी पाटील (गूळ उत्पादक)