उन्हाचा कडाका! जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला बसू लागले चटके, मंडप, मॅटिंग व्यवस्था करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:15 PM2023-04-22T12:15:17+5:302023-04-22T12:15:43+5:30
मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तयार केलेला कुल कोट तीन वर्षातच निघून गेला
जोतिबा: उन्हाचा कडाका वाढल्याने जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला तापलेल्या फरशीचे चटके बसु लागले आहेत. सावली नसल्याने डोक्यावर उन्हाचा मारा होत आहे. उन्हापासून भाविकांचे संरक्षण होण्यासाठी मंदिर परिसरात मंडप तसेच मॅटिंग व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरावर वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. दर रविवार पौर्णिमासह, सर्व सुट्टया, महत्वाच्या उत्सवानांही भाविक जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. जोतिबा मंदिर आवारात संपुर्ण दगडी फरशी आहे. मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दगडी फरशी भर उन्हात तापते. तापलेल्या फरशीचे चटके भाविकांच्या पायाला बसतात. याचा अबाल वृध्द, भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाविकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर व्यवस्थापकाने मंदिर परिसरात मंडप व मॅटिंगची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. दर्शन रांगेवर पडदा तसेच मॅटींग टाकण्याची गरज आहे.
'कुल कोट' तीन वर्षातच निघून गेला
तीन वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने भाविकांच्या पायाला गारवा मिळण्यासाठी मंदिर प्रदक्षिणा मार्गावर कुल कोट तयार केला होता. संपुर्ण मंदिरा सभोवती हा कुल कोट तयार करण्यात आला होता. एकूण हा साडेपाच हजार चौ. फुटाचा मारलेल्या कुल कोटाची मुदत १० वर्षाची होती पण तीन वर्षातच निघुन गेल्याने भाविकांना आता त्रास होत आहे.