Kolhapur: घरावर ड्रोन, टेहाळणी करतंय कोण?; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण, पोलिसांनी मागवली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:43 PM2024-09-14T15:43:22+5:302024-09-14T15:43:36+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात टोप, दानोळी, नरंदे, शिरोली, पडळसह काही ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. अचानक सुरू ...

due to the hovering of drones An atmosphere of fear in rural areas In Kolhapur district | Kolhapur: घरावर ड्रोन, टेहाळणी करतंय कोण?; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण, पोलिसांनी मागवली माहिती

Kolhapur: घरावर ड्रोन, टेहाळणी करतंय कोण?; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण, पोलिसांनी मागवली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात टोप, दानोळी, नरंदे, शिरोली, पडळसह काही ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. अचानक सुरू असलेल्या या ड्रोनच्या घिरट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. सरकारी काम, खासगी ड्रोन की चोरट्यांच्या शोधासाठी कोणी ड्रोन उडवत आहेत का? याची माहिती घेतली जात आहे. येत्या दोन दिवसात या प्रकाराची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरी होत असल्याच्या अफवा असल्याने काही गावांत तरुणांनी गस्तही सुरू केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी, सरकारी कामासाठी काही ठिकाणी माहिती घेतली जात आहे का, काही ठिकाणी खासगी ड्रोन उडवले जात आहेत का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सर्वसामान्यांच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारी ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसत आहेत. ड्रोन उडविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आणि महापालिकेचा परवाना सक्तीचा आहे.

ड्रोन वापरायचा नियम

ड्रोन वापरण्यासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक असून, पुणे आणि दिल्ली येथे ते तंत्रशुद्धपणे दिले जाते. ड्रोनचे वजन, त्यामुळे होणारे अपघात, रहिवासी इमारतींवर उडविण्यासाठी आवश्यक उंची याविषयी अनेक नियम पाळावे लागतात. ड्रोनचा वापर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागात ड्रोन उडविण्यावर निर्बंध आहेत. पोलिस, प्रशासनाची कार्यालये, विमानतळ, महत्त्वाची रुग्णालये, प्रयोगशाळा, संरक्षणविषयक संस्था, समुद्रकिनारे आदी ठिकाणी ड्रोन उडवता येत नाही. ते उडविण्यासाठी प्रशिक्षित, प्रमाणपत्रधारक कर्मचारी आवश्यक आहे.

घरातील सोने चाचपणीसाठी ?

रात्रीच्या वेळी घरावर फिरणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून घरात सोने किती आहे, याची चाचपणी केली जात आहे, अशी अफवाही रहिवाशांच्यात आहे. ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोरी केली जात असल्याचा संशयही रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने काहीजण संध्याकाळी सात वाजताच घरातील दिवे बंद करून झोपत असल्याची ग्रामीण भागात स्थिती आहे.

रात्री उडवल्या जाणाऱ्या ड्रोनची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल. ड्रोन आकाशात दिसल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

Web Title: due to the hovering of drones An atmosphere of fear in rural areas In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.