माती परीक्षण शेतीच्या आरोग्याचा आरसा, कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीचा पोत कसा.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Published: July 2, 2024 04:43 PM2024-07-02T16:43:45+5:302024-07-02T16:44:40+5:30
शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी जागृती नसल्यानेच तब्बल आठ तालुक्यांत नत्राचे प्रमाण कमी झाले
राजाराम लोंढे
कोल्हापूर : उत्पादन खर्चात झपाट्याने वाढ होत असल्याने पिकांचे उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. पण, उत्पादन वाढीतील मूळ घटक म्हणजे जमीन असून, त्या जमिनीच्या आरोग्याची तपासणी कधी केली का? याकडे सोयस्कर दुर्लक्ष केले जाते. किमान दोन वर्षांतून एकदा आपल्या माती परीक्षण करून मातीची आरोग्य पत्रिका तयार करून घेतली पाहिजे. ही पत्रिकाच शेतीच्या आरोग्याचा आरसा असतो. शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी जागृती नसल्यानेच तब्बल आठ तालुक्यांत नत्राचे प्रमाण कमी झाले आहे.
माणसाप्रमाणेच जमिनीचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. जादा उत्पादनाच्या स्पर्धेत जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. आपल्या जमिनीत कशाची कमतरता आहे? त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजण्यासाठी किमान दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून घेतले पाहिजे.
यावर्षी १४ हजार सँपलचे उद्दिष्ट
गेल्या वर्षभरात ८ हजार ६४१ सँपलची तपासणी करून शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड दिले आहे. यावर्षी १४ हजार सँपलचे उद्दिष्ट असून यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १० हजार २००, अन्न सुरक्षा अभियानमधून २ हजार ५००, सेंद्रिय शेतीमधून ५००, तर इतर योजनांमधून एक हजार मातीच्या सँपल तपासणी केली जाणार आहे.
जमिनीतील नत्र यामुळे कमी होते
साधारणत: जिथे जास्त पाऊस पडतो आणि पाणी वाहून जाते त्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच गनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, आजरा तालुक्यात नत्राचे प्रमाण खूपच कमी दिसते.
माती परीक्षाची गरज का?
जमिनीतील भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्र्व्यांची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता याचा अंदाज येतो. आरोग्यपत्रिका हातात आल्याने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर टाळता येतो. भौतिक गुणधर्मांमध्ये जमिनीचा पोत, कणांची संरचना, जलधारक क्षमता, आभासी घनता, सच्छिंद्रतेचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात नत्र, स्फूरद, पालशा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन व जैविक गुणधर्मात जीवाणू, बुरशी, गांढूळ, मुंग्या माहिती कळते.
तालुकानिहाय जमिनीतील घटकांचे प्रमाण
तालुका - नत्र - स्फूरद - जस्त - लोह - तांबे - बोरॉन - सल्फर
आजरा - कमी - मध्यम - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता
गगनबावडा - कमी - अधिक - जास्त - कमतरता - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे
भुदरगड - कमी - जास्त - कमरता - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसे
चंदगड - मध्यम - मध्यम - कमतरता - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसे
गडहिंग्लज - कमी - मध्यम - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे
हातकणंगले - मध्यम - मध्यम - पुरेसे - कमतरता - पुरेसे - कमतरता - कमतरता
कागल - कमी - मध्यम - कमतरता - कमतरता - पुरेसे - पुरेसे - पुरेसे
करवीर - कमी - अधिक - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसे
पन्हाळा - मध्यम - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसे
राधानगरी - मध्यम - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - कमतरता - पुरेसे
शाहूवाडी - मध्यम - जास्त - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे - पुरेसे
शिरोळ - कमी - जास्त - पुरेसे - कमतरता - पुरेसे - पुरेसे - कमतरता
आमच्या विभागाच्या वतीने मातीच्या सँपल घेतोच, पण इतर शेतकऱ्यांनी किमान दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून घेतले पाहिजे. आरोग्य पत्रिकेनुसार आवश्यकता पाहून घटक दिले तर उत्पादन चांगले मिळू शकते. - रमाकांत कांबळे (जिल्हा मृद सर्व्हेक्षण व तपासणी अधिकारी, कोल्हापूर)