..अन् रेल्वे समिती अध्यक्षांनी दिला राजीनामा, बैठकीवर बहिष्कार टाकून ३० खासदार पडले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:50 PM2022-10-19T12:50:08+5:302022-10-19T12:50:56+5:30
उपस्थित सर्व खासदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अतुल आंबी
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य विभागीय रेल्वे समितीतील खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नकारात्मक उत्तरे दिल्याने सोलापूर विभागीय रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय तीस खासदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकून वॉक आऊट केले. त्यामुळे राज्यातील रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.
पुणे येथील रेल्वेच्या मुख्यालयात मंगळवारी पुणे आणि सोलापूर विभागीय समितीची बैठक होती. या बैठकीसाठी समितीचे अध्यक्ष तथा म्हाडाचे खासदार रणजितसिंह यांच्यासह तीस खासदार उपस्थित होते. बैठकीपूर्वी राज्यातील रेल्वेचे विविध प्रश्न सदस्य खासदारांनी समितीसमोर लेखी पाठवले होते. त्यावर कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याबाबत सकारात्मक उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित होते. परंतु सर्वांच्याच प्रश्नांना अधिकाऱ्यांनी नकारात्मक उत्तरे दिली.
सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याऐवजी रेल्वेकडे उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहून नकारात्मक उत्तरे आल्याने उपस्थित सर्व खासदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर महाराष्ट्र रेल्वेच्या अशा नकारात्मकतेमुळे अध्यक्ष रणजितसिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्याला समर्थन करत सर्वच खासदारांनी वॉक आऊट केले.
बैठकीस खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीनिवास पाटील, ए.के. लाहोटी, राजेश अरोरा, मनजित सिंग, मुकुल जैन यांच्यासह पुणे विभागाचे रेणू शर्मा, ब्रिजेशकुमार सिंग, प्रकाश उपाध्याय, सोलापूर विभागाचे निरजकुमार दोहारे, चंद्रा भूषण, प्रदीप हिरडे, आदी उपस्थित होते.
केंद्रीय बैठकीत होणार चर्चा
केंद्रीय रेल्वे समितीची गुरूवारी (दि.२०) दिल्लीत बैठक आहे. राज्यातील खासदार धैर्यशील माने आणि उदयनराजे हे त्या समितीचे सदस्य आहेत. राज्यातील या गलथान कारभाराची सर्व माहिती त्या बैठकीत देणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
कोल्हापूरचे प्रश्न
कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वेबाबत खासदार माने यांनी लेखी प्रश्न दिले होते. त्यामध्ये, बंद केलेल्या चार गाड्या पुन्हा सुरू करणे, कराड-इचलकरंजी-बेळगाव मार्गाला मंजुरी देणे, डब्बल लाईन, बंद केलेले थांबे सुरू करणे, उड्डाण पुलाचे प्रश्न, निकृष्ट दर्जाचे काम, सर्व्हिस स्टाफ नाही, पॅसेंजर गाड्यांची संख्या कमी केली, आदी प्रश्नांचा समावेश होता.
खासदारांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न : लाहोटी
दरम्यान, रेल्वेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, विभागीय समितीच्या बैठकीत रेल्वेच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. खासदारांच्या मार्गदर्शनानुसार रेल्वे प्रशासन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करेल तसेच खासदारांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी सांगितले.
रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात कोविडपूर्वी ज्या स्थानकावर रेल्वे थांबा होता असे सर्व पूर्ववत थांबे मिळावेत, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांचे रेल्वेसंबंधी प्रश्न सुटावेत, भुयारी मार्ग व दोन गावांना जोडणारे रस्ते सुरू करावेत. सर्व स्टेशनवर चांगल्या सुविधा व सुधारणा कराव्यात, किसान रेल चालू ठेवावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यासाठी वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा हे प्रश्न सुटत नाहीत. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाहीत. थातूरमातूर उत्तरे देतात. रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सुटत नसल्याने सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहे. - रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार, माढा