Kolhapur: ..त्यामुळे विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली, खासदार शाहू छत्रपती यांनी केला आरोप 

By भारत चव्हाण | Published: July 15, 2024 05:35 PM2024-07-15T17:35:02+5:302024-07-15T17:35:53+5:30

उद्या विशाळगडावर भेट देऊन विचारपूस करणार

due to which an incident of violence took place at Vishalgad, alleged MP Shahu Chhatrapati  | Kolhapur: ..त्यामुळे विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली, खासदार शाहू छत्रपती यांनी केला आरोप 

Kolhapur: ..त्यामुळे विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली, खासदार शाहू छत्रपती यांनी केला आरोप 

कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणाप्रकरणी आंदोलन होणार आहे याची कल्पना असूनही राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे हिंसाचाराची घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असल्याचा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला आहे.

विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे, असे शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली.

राज्य सरकारने रविवारी अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश या पूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती, असे सांगत या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शाहू छत्रपती यांनी केली आहे.
माजी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो. हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई करावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्या, मंगळवारी आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, असे सांगत विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये, अशी अपेक्षा पत्रकात व्यक्त केली आहे.

Web Title: due to which an incident of violence took place at Vishalgad, alleged MP Shahu Chhatrapati 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.