अनलॉक आणि नारळी पौर्णिमेमुळे एस. टी.ला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:28 AM2021-08-20T04:28:13+5:302021-08-20T04:28:13+5:30
कोल्हापूर : अनलॉक झाल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरु झाले आहेत. आता तोंडावर नारळी पाैर्णिमा आल्याने एस. टी.ने हा हंगाम ‘कॅच’ ...
कोल्हापूर : अनलॉक झाल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरु झाले आहेत. आता तोंडावर नारळी पाैर्णिमा आल्याने एस. टी.ने हा हंगाम ‘कॅच’ करण्यासाठी तयारी केली आहे. जिल्ह्यातील १२ आगारांतून ४० जादा गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने केली आहे. ज्योतिबा रोड सुरु झाल्यास या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे.
कोरोनामुळे एस. टी. प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. पण सोमवारपासून दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने बऱ्यापैकी व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. यामुळे लोकांचे येणे-जाणेही वाढले आहे. लोक कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी सेवांनीदेखील गती घेतली आहे.
एस. टी.मध्ये ५० टक्के प्रवासी वाहतुकीचे निर्बंध असल्याने त्याचे पालन करुन निम्म्या प्रवासी संख्येवर गाड्या धावत आहेत. एका एस. टी.मध्ये २५ प्रवासी बसवले जात आहे. मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती मात्र कायम आहे.
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणासाठी ये-जा वाढणार आहे. अजून मंदिरे बंद असली तरी बाहेरुन दर्शन घेण्याची लोकांची मानसिकता आहे. जिल्ह्यात नारळी पौर्णिमेला नृसिंहवाडी आणि गगनबावड्याला जाणाऱ्या प्रवासी भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच या मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
प्रवाशांची गर्दी
अनलॉक झाल्यानंतर एस. टी.च्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज ५२५ बसेसच्या पंधराशेच्यावर फेऱ्या होत असल्याने बसस्थानके पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. रोज ४० हजारांवर प्रवासी एस. टी.मधून प्रवास करत आहेत.
या मार्गांवर वाढणार फेऱ्या
कोल्हापूर ते इचलकरंजी
कोल्हापूर ते नृसिंहवाडी
कोल्हापूर ते सांगली मिरज
कोल्हापूर ते गगनबावडा
कोल्हापूर ते ज्योतिबा
कोल्हापूर ते सोलापूर
कोल्हापूर ते पुणे
प्रतिक्रिया
गगनबावडा व नृसिंहवाडीला जाणाऱ्या प्रवासी भाविकांची संख्या जास्त असल्यानेच या मार्गांवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची सर्वप्रकारची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे. जशी मागणी वाढेल तशी फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे.
- शिवराज जाधव, वाहतूक अधिकारी, कोल्हापूर आगार