अवेळच्या पावसाने कोल्हापूरला हुडहुडी, कमाल तापमानात १० अंश सेल्सिअसने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:02 PM2020-11-28T20:02:18+5:302020-11-28T20:04:09+5:30
Winter Session Maharashtra, kolhapurnews दक्षिण भारतातील निवार चक्रीवादळ आणि उत्तर भारतातील थंडीची लाट या दोन्हींचा एकत्रित परिणामांमुळे झालेला पाऊस आणि झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरकरांना चांगलीच हुडहुडी भरवली.
कोल्हापूर : दक्षिण भारतातील निवार चक्रीवादळ आणि उत्तर भारतातील थंडीची लाट या दोन्हींचा एकत्रित परिणामांमुळे झालेला पाऊस आणि झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनी शनिवारी कोल्हापूरकरांना चांगलीच हुडहुडी भरवली.
भुरभुरणाऱ्या पावसासोबतच पहाट उगवली. आठनंतर पाऊस थांबला तरी दिवसभर ढगाळ वातावरण आणि अंगात हुडहुडी भरवणाऱ्या गार वाऱ्यामुळे अवघे जनजीवनच गारठून गेले. शुक्रवारपर्यंत कमाल तापमानाचा ३१ अंशांवर असणारा पारा शनिवारी एकदम २२ अंशांपर्यंत खाली आला.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोल्हापूरवरही होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शुक्रवारी रात्रीपासूनच वारे सुटल्याने वादळाची चाहूल लागली. मध्यरात्रीपासून वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि भुरभुर पाऊस सुरू झाला. सकाळी आठपर्यंत तो सुरूच राहिला.
पाऊस थांबला तरी वातावरण गच्च राहिले. गार वाऱ्यामुळे दिवसभर कमालीची थंडी जाणवत होती. सूर्यदर्शन अजिबात झाले नाही. कुंद आणि नीरसवाणे वातावरण राहिले. अजून एक दिवस असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर कमाल तापमान ३१ पर्यंत जाणार आहे. अंशत: ढगाळ वातावरण राहील; पण किमान तापमान १५ ते १६ अंशांपर्यंत खाली येणार असल्याने थंडीचा सामना करावा लागण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.