पाणीटंचाईग्रस्त देवाच्या डोंगरावर दुधाची गंगा
By admin | Published: March 26, 2017 10:05 PM2017-03-26T22:05:17+5:302017-03-26T22:05:17+5:30
वर्गीस कुरीयनची गोष्ट : पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली
शिवाजी गोरे ल्ल दापोली
दापोलीतील देवाचा डोंगर या छोट्याशा खेड्यातल्या वर्गीस कुरीयनची गोष्ट आहे. भीषण पाणीटंचाई असल्याने जनावरांसाठी ओला चारा नाही. पाणीटंचाई जणूकाही गावाच्या पाचवीलाच पूजलेली. अशा या पाणीटंचाईग्रस्त गावातल्या धनगर वस्तीतून रोज ५०० लीटर दूध संकलित करून स्वत:बरोबरच इतरांनाही चार पैसे मिळवून देणाऱ्या बाबू बावदानेंची ही प्रेरणादायी कहाणी!
सरकारी योजनांचा फायदा खऱ्या लाभार्थींपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत दगडालाही पाझर फोडण्याची जिद्द उराशी बाळगून झटत राहणाऱ्या बाबू बावदानेंची कहाणी सरकार काही करत नाही म्हणत स्वस्थ बसणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
दापोलीमधल्या देवाचा डोंगर गावातली ही धनगर वस्ती. समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच. येथे केवळ हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण सुरू असते. मग, ओल्या चाऱ्याचं तर दुर्भिक्ष्यच! अशा परिस्थितीतही बाबू बावदानेंचा दिवस पहाटे चारला सुरु होतो आणि मग लगबग सुरू होते दूध संकलनाची! धनगर वस्तीतल्या चाळीस कुटुंबांकडचं मिळून पाचशे लीटर दूध बाबूकडे जमा होतं, हे सगळं दूध घेऊन मग बाबू बावदाने तालुक्याला निघतात. पत्नी दिवसभर जनावरांची देखभाल करीत असते.
कोकणात डोंगर - दऱ्यात राहणारा धनगर समाज आजही दुर्ल दुर्लक्षित आहे. एकीकडे पशुधन कमी होत असले, तरीही देवाच्या डोंगरावरील बाबू बावदाने या तरुणाच्या सहकार्याने दूधगंगा वाहात आहे. हेच दूध धनगर समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. या व्यवसायातून अनेकांची चूल पेटवण्याचा प्रयत्न बाबू बावदाने या तरुणाने केला आहे. प्यायला पाणी नाही, हिरवा चारा नाही, अशा प्रतिकूल परिस्थिती देवाच्या डोंगरावरील वाडीतून दिवसाला ५०० लीटर दूध तालुक्याला येत आहे.
देवाच्या डोंगर येथील बाबू बावदाने या तरुणाची कहाणी. अख्खं कुटुंब पशुधन सांभाळण्यात गुंतलंय. बायको, आई दिवसभर जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करतात. जनावरांना चारा घालणे, त्यांचा सांभाळ करण्यात वडिलांचा दिवस जातो. बाबू सकाळी उठून दूध काढतो. वस्तीवरील सर्वांचे दूध संकलित करून वाहनाने तालुक्याला येतो.
झेप घ्यायचीय : सरकारीबाबूंचा अनुभव चीड आणणारा...
शेळ्या-मेंढ्यांचे पालन करून दूध-दुभते तयार करून विकणे, हेच उदरनिर्वाहाचे एक साधन आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपलं पशूधन सांभाळलं आहे. बाबूसारख्या जिद्दी तरुणाला या व्यवसायात खरंतर मोठी झेप घ्यायची आहे. सरकारी योजनांबद्दलचा बाबूचा हा अनुभव चीड आणणारा आहे.