पश्चिम घाटामुळे अलमट्टीचे ‘उदर’ भरले, १०७ टीएमसी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:51 AM2019-07-20T10:51:58+5:302019-07-20T10:56:19+5:30
पश्चिम घाटात पडलेल्या दमदार पावसामुळेच अलमट्टी पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या असणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी यांच्या एकत्रित पाणीसाठ्यामुळेच अलमट्टीचे ‘उदर’ भरले आहे.
पोपट पवार
कोल्हापूर : एकीकडे जुलै संपत आला तरी कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा नसल्याने शेतीसह भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. दुसरीकडे मात्र याच कृष्णा नदीवर वसलेले बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरत आले आहे.
या धरणात शुक्रवारपर्यंत तब्बल १०७ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदा उत्तर कर्नाटकात पुरेसा पाऊस झालेला नाही; मात्र पश्चिम घाटात पडलेल्या दमदार पावसामुळेच अलमट्टी पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या असणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी यांच्या एकत्रित पाणीसाठ्यामुळेच अलमट्टीचे ‘उदर’ भरले आहे.
गतवर्षीही जुलैमध्ये अलमट्टीत १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असणाºया अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी इतकी पाणीसाठा क्षमता असून, कृष्णा नदीवरील हे सर्वात मोठे धरण मानले जाते. अलमट्टीच्या पाण्यावरच उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हे हिरवेगार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी अलमट्टीच्या पाणीपातळीकडेच येथील बळिराजा डोळे लावून बसलेला असतो.
यंदा उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, बिदर, बेल्लारी, कलबुर्गी, यादगिरी, रायचूर, गदग, धारवाड, हावेरी, नॉर्थ कॅनरा आणि कोप्पल या सर्वच जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस नसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, उत्तर कर्नाटकातील अलमट्टी, बसवसागर या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने बळिराजा चांगलाच सुखावला आहे. दरम्यान, घटप्रभा, मलप्रभा आणि तुंगभद्रा धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा अत्यल्प असल्याने गोकाक, होस्पेट या शहरांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
...अन् अलमट्टीने बदलले जीवनमान...
कधीकाळी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अलमट्टीच्या पाण्याने सधन बनविले आहे. कडधान्याच्या पिकावर गुजराण करणारा येथील शेतकरी अलमट्टीच्या पाण्यामुळे उसाची शेती करू लागल्याने त्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. विशेष म्हणजे अलमट्टी आणि यादगिरी जिल्ह्यांतील बसवसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे गुलबर्गा, रायचूर, विजापूर, यादगिरी आणि बागलकोट जिल्ह्यांतील तब्बल सहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
तुंगभद्रेची चिंता...
कर्नाटकातील होसपेट येथे तुंगभद्रा नदीवर असलेल्या तुंगभद्रा धरणात सध्या अपेक्षित पाणीसाठा नसल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शहरे गॅसवर आहेत. सध्या या धरणात १५.६३ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. गतवर्षी या धरणात जुलैमध्ये ९३.३५ टीएमसी इतका पाणीसाठा होता.
उत्तर कर्नाटकातील धरणांमधील पाणीसाठा...
धरणाचे नाव क्षमता पाणीसाठा
- अलमट्टी- १२३ १०७
- तुंगभद्रा- १००.८६ १५.६२
- बसवसागर- ३७ २२.४५
- मलप्रभा- ३४.३५ ९.५९
- घटप्रभा- ४८.९८ २२.७७