डफळापूर योजनेचे काम पुन्हा बंद

By admin | Published: January 8, 2015 11:20 PM2015-01-08T23:20:47+5:302015-01-09T00:26:17+5:30

बसाप्पाचीवाडीचे ग्रामस्थ आक्रमक : कामगारांना हुसकावून लावले; आंदोलनाचा इशारा

Duffalapura scheme work again | डफळापूर योजनेचे काम पुन्हा बंद

डफळापूर योजनेचे काम पुन्हा बंद

Next

कवठेमहांकाळ/डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील पाणी योजनेचे काम बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे सहा दिवसांपासून पोलीस बंदोबस्तात सुरू होते. आज (गुरुवार) बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. ट्रॅक्टर, जेसीबीसह कामगारांना बसाप्पाचीवाडी गावाबाहेर हुसकावून लावले. आठवड्यात दोनवेळा काम बंद पाडले आहे. कवठेमहांकाळ पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करीत योजनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी जिल्हा पोलीसप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. डफळापूर पाणी योजनेसाठी गेली सहा दिवस बसाप्पाचीवाडी तलाव व परिसरात दीड किमी चर खुदाई व जलवाहिनीचे काम सात जेसीबी व पन्नास कामगारांकरवी करण्यात आले. आज सकाळी सात वाजता जेसीबीच्या सहाय्याने चर खुदाईचे काम सुरू होते. बसाप्पाचीवाडी येथील पन्नासहून अधिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले. ग्रामस्थांनी आरडाओरड करत दोन पोलीस, कामगार व वाहनांना निघून जाण्यास सांगितले. आज खोदण्यात आलेली चर जबरदस्तीने जेसीबीने बुजवण्यास भाग पाडली. कामगारांना वाहनासह बसाप्पाचीवाडी हद्दीच्या बाहेर हुसकावून लावले. यावेळी पोलिसांना जमावापुढे बघ्याची भूमिका घ्यावी लागली. पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे योजनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण व माजी सभापती मन्सूर खतीब यांनी जिल्हा पोलीसप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन ठोस कारवाई करण्याबाबत साकडे घातले.
वारंवार काम बंद पाडले जात असल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेबद्दल डफळापूरमध्ये संताप व्यक्त होत आहे. कामात अडथळा आणणाऱ्या ग्रामस्थांवर आज गुन्हे दाखल होणार असल्याची शक्यता आहे, तर जमावामध्ये मोघमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील काही ग्रामस्थ असल्याचा संशय डफळापूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
तसेच बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) तलावातील पाण्याचा एक थेंबही उचलू देणार नाही. जबरदस्तीने पाणी उचलण्याचा प्रयत्न केल्यास या पाण्यासाठी मोठे आंदोलन छेडू, असा इशारा आज बसाप्पाचीवाडी, इरळी, कोकळे, मोघमवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
बसाप्पाचीवाडी तलावासाठी प्रशासनाने मोघमवाडी, इरळी, अंकले, कोकळे, बसाप्पाचीवाडी या गावांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. गेल्या दोन वर्षात म्हैसाळच्या योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात आले. म्हैसाळ योजनेचा कालवा या तलावापासून जत तालुक्यात गेला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून बसाप्पाचीवाडी तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी प्रशासनाने सोडले. या पाण्याने हा तलाव चाळीस टक्के भरण्यात आला. तरीही हे पाणी या परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्पच आहे. परंतु जत तालुक्यातील डफळापूर या गावाला पेयजल योजनेसाठी या तलावातून पाणी हवे, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी व नेत्यांंनी केली आहे.
बसाप्पाचीवाडी, इरळी, कोकळे, मोघमवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी, डफळापूर पाणी योजनेचे काम करण्यात येऊ नये म्हणून न्यायालयात दावा दाखल केला आहे. असे असतानाही पोलीस बंदोबस्तात हे काम कसे सुरू केले? असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.
आज (गुरुवारी) बसाप्पाचीवाडी येथे कोकळे, मोघमवाडी, इरळी या गावांतील शेतकरी व नागरिक यांची याबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये बसाप्पाचीवाडी तलावातील पाण्याचा एक थेंबही डफळापूरकरांना उचलू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. या तलावातील पाणी आमच्या तालुक्यातील गावांनाच पुरत नाही, तरीही जत तालुक्याची तहान कशी भागवायची? असा सवालही या बैठकीत नागरिकांनी केला. नागरिकांच्या भावना जाणून न घेता जर डफळापूरकरांना पाणी दिले, तर इरळी, कोकळे, मोघमवाडी, बसाप्पावाडी गावातील लोक, शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला. बैठकीसाठी भारत ओलेकर, बंडू ओलेकर, शिवाजी माने, दिलीप लोखंडे, प्रकाश ओलेकर, सुऱ्याबा गोयकर, बिरुदेव ओलेकर, लालू ओलेकर, अशोक लवटे, शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

पोलीसही हतबल
बसाप्पाचीवाडी येथील पन्नासहून अधिक ग्रामस्थांनी योजनेचे काम बंद पाडले. ग्रामस्थांनी आरडाओरडा करत दोन पोलीस, कामगार व वाहनांना निघून जाण्यास सांगितले. आज खोदण्यात आलेली चर जबरदस्तीने जेसीबीने बुजवण्यास भाग पाडली. कामगारांना वाहनासह बसाप्पाचीवाडी हद्दीच्या बाहेर हुसकावून लावले. यावेळी पोलिसांना जमावापुढे बघ्याची भूमिका घ्यावी लागली, तर बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) तलावातील पाण्याचा एक थेंबही उचलू देणार नाही. जबरदस्तीने पाणी उचलण्याचा प्रयत्न केल्यास या पाण्यासाठी मोठे आंदोलन छेडू, असा इशारा आज बसाप्पाचीवाडी, इरळी, कोकळे, मोघमवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Duffalapura scheme work again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.