‘डमी’ अर्जातही घराणेशाही; निष्ठावंत वाऱ्यावरच
By admin | Published: September 29, 2014 01:00 AM2014-09-29T01:00:07+5:302014-09-29T01:16:49+5:30
विधानसभा निवडणूक; खळ-पोस्टर, घोषणांपुरतेच कार्यकर्त्यांचा वापर
राजाराम लोंढे / कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबर प्रत्येकाने आपला ‘डमी’ अर्ज दाखल केला आहे; पण यामध्ये कार्यकर्त्यांऐवजी घरातील व्यक्तींचाच भरणा अधिक दिसत आहे. पत्नी, मुलगा, भाऊ, आई यांचेच अर्ज ‘डमी’ म्हणून भरल्याने कार्यकर्ते आता केवळ खळ-पोस्टर व घोषणांसाठीच राहणार आहेत.
कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्याला विशेष महत्त्व असते, किंबहुना कार्यकर्त्यांशिवाय निवडणूक हे समीकरणच जुळू शकत नाही. कार्यकर्त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना ग्रामपंचायत, विकास संस्था, दूध संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी संधी दिली जात होती. त्यामुळे सामान्य कुटुंबातील माणसाला सरपंच, पंचायत समितीचा सभापती ते थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत संधी मिळायची. पण, अलीकडील दहा-पंधरा वर्षांत निवडणुकीतील चित्रच पालटले आहे. ग्रामपंचायतीपासूच घराणेशाहीने शिरकाव केला आहे. जिल्हा पातळीवरील नेते जसे करीत आहेत, त्याची पुनरावृत्ती स्थानिक पातळीवरील नेतेही करू लागले आहेत. सरपंच, दूध संस्था, विकास संस्थांचा अध्यक्ष आपल्याच घरातील, जिल्हा परिषद नाही जमली, तर पंचायत समिती तरी घरात ठेवायचीच यासाठी नेत्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारी नसेना, पण किमान पक्षांसह नेत्यांकडून सन्मानाची वागणूक तरी मिळावी, एवढीच अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. पूर्वी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत बहुतांश उमेदवार हे आपल्या अर्जासोबत आपल्या ‘विश्वासू कार्यकर्त्या’चा अर्ज (डमी) भरत होते; पण काळानुरूप नेत्यांबरोबर कार्यर्त्यांची निष्ठाही बदलत गेली. निष्ठेची जागा पैशांनी घेतल्याने राजकारणातील रंग बदलत गेले आहेत. सर्वच मतदारसंघांतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करताना त्याठिकाणी दुसरा ‘डमी’ म्हणून आपल्याच कुटुंबातील अर्ज दाखल केलेला आहे. कदाचित राजकीय दबावापोटी कार्यकर्ता माघार घेणार नाही या भीतीने की ‘विश्वासातील कार्यकर्ते’च नसल्याने कुटुंबातील ‘डमी’ अर्ज भरावे लागतात. हेच समजत नाही. हे चित्र पाहिले तर कार्यकर्ते केवळ खळ-पोस्टर व घोषणा देण्यापर्यंत राहील, हे मात्र निश्चित आहे.