कोल्हापूर पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिडिओ चित्रीकरणामुळं झालं निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 02:02 PM2022-06-04T14:02:15+5:302022-06-04T14:12:52+5:30
पोलीस भरतीवेळी लेखी व शारीरिक परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. या व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली
कोल्हापूर : पोलीस भरतीवेळी लेखी परीक्षेसाठी डमी उमेदवार बसविल्या प्रकरणी शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिली आहे.
परमेश्वर पंडित गवळी (रा. आमसरी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), रवींद्र रत्नाकर दांडगे (रा.सुरंगळी, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्यासह दोन डमी उमेदवार अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामध्ये ७५ शिपाई पदासाठी २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती; मात्र कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया २०२१ मध्ये राबविण्यात आली. ७५ जागांसाठी ५०० हून अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी बसले होते. यंदा प्रथमच लेखी परीक्षा घेऊन शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. लेखी व शारीरिक परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते.
या व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी करत असताना गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना परमेश्वर गवळी, रवींद्र दांडगे या दोन उमेदवारांच्या जागी लेखी परीक्षेस अन्य कोणीतरी बसल्याचे दिसून आले. त्यांनी याची खात्री करण्यासाठी शारीरिक चाचणी दरम्यानचे व्हिडिओ चित्रीकरण तपासले. यामध्ये दोनही परीक्षेसाठी दोन भिन्न व्यक्ती असल्याचे दिसून आले. या दोघांनी लेखी परीक्षेच्या वेळी दोन डमी उमेदवार बसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.