एका रात्रीत शंभरावर पाणी मीटरवर डल्ला
By admin | Published: December 1, 2015 12:05 AM2015-12-01T00:05:01+5:302015-12-01T00:15:26+5:30
मंगळवार पेठेतील प्रकार : चोरीमुळे नागरिकांतून संताप
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील साठमारी गल्ली, महालक्ष्मीनगर, मंगेशकरनगर, काटे पॅसेज, जांभळे गल्ली, देवणे गल्ली, पीटीएम, आदी परिसरातील १०० हून अधिक घरगुती पाण्यांच्या मीटरची चोरीची खळबळजनक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मीटर चोरी झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नागरिकांनी तक्रार दिली आहे. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नळांना पाणी आल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यानंतर हळूहळू नागरिक जागे होतील, तसा या मीटर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीस फक्त साठमारी परिसरातील काही पाणी मीटर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले; पण सकाळी आठ वाजेपर्यंत मीटर चोरीची व्याप्ती नागरिकांच्या निदर्शनास आली. काही वेळातच परिसरातील १०० हून अधिक मीटर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, नगरसेवक विजय सूर्यवंशी आणि नगरसेवक संभाजी जाधव यांनी मीटर चोरीप्रश्नी परिसरात पाहणी करून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर सकाळी दहा वाजता पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी चोरीला गेलेल्या पाणी मीटरचा पंचनामा केला. मध्यरात्री दीड ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पाच ते सहाजणांची टोळी
पोलिसांनी चौकशी केली असता चोरी करणारे अंदाजे पाच ते सहाजणांचे टोळके असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी काहीजणांनी एक मारुती व्हॅन आणि एक स्कूटरही होती, असे सांगितले. या परिसरातील एका बांधकामावरील वॉचमनने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार व्यक्ती एक साहित्य भरलेले पोते मारुती व्हॅनमध्ये टाकत असताना पाहिल्याचे पोलिसांना सांगितले; पण त्याने बांधकाम मालकाला उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नसल्याने त्या वॉचमनने त्याकडे दुर्लक्ष के ले.
गस्त बंद; गुरखा गायब
या परिसरातील वॉचमन फक्त पैसे मागण्यासाठी येतो; पण त्याची फिरती अलीकडे बंदच असल्याचेही अनेक नागरिकांनी सांगितले, तर पोलिसांचीही गस्त अलीकडच्या
काही दिवसांत या परिसरात दिसली नसल्याच्या तक्रारीही अनेकांनी यावेळी पोलिसांकडे केल्या.
संगनमतानेच प्रकार होत असल्याची तक्रार
शहरात राजरोसपणे पाणी मीटरच्या चोरीचे प्रकार घडत आहेत. हे चोरीचे प्रकार संगनमताने होत असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष सरेश पोवार यांनी केली. शहरातील लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल, स्टॅण्ड, उपनगरे, कत्तलखाना, मटनमार्केट, आदी ठिकाणी जुने पट्टी, व्हॉल्व्ह असलेल्या पितळी पाण्याच्या मीटरची चोरी हाण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, हे किरकोळ प्रकार असल्याने याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही; पण मंगळवार पेठेतील प्रकार पाहता हे संगनमतानचे होत असल्याचा संशय बळावला आहे. पाणी मीटर दुरुस्ती करण्यासाठी काढणे ते नवीन बसविणे ही कामे पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांशिवाय कोणाला येत नाहीत. त्यामुळे ही पाणी मीटर चोरीही संगनमताने होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही मीटर वितळवून त्यांची विक्री केली जाते व पुरावा नष्ट केला जातो. त्यामुळे या चोरीचा छडा लावावा, असेही पोवार यांनी अतिरिक्तआयुक्त नितीन देसाई यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.