दिंडनेर्लीच्या ‘शुक्ला’ची सोनेरी कामगिरी
By admin | Published: March 31, 2015 11:55 PM2015-03-31T23:55:50+5:302015-03-31T23:59:54+5:30
अपंगत्वावर मात : नॅशनल पॅरॉलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
दिंडनेली : ‘अवतीभवतीच्या वादळांशी तर सगळेच झुंजतात; पण मी स्वत:शीच झुंजत राहिले, अन् ज्या ईश्वराने माझ्या देहाला अर्ध्यावर ठेवले, त्याच ईश्वराला मी ‘सुवर्ण’ पदक वाहिले.’हे बोल आहेत दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील शुक्ला बिडकर हिचे. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या १४व्या नॅशनल पॅरॉलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातून भाग घेतलेली एकमेव खेळाडू होती. तिने या स्पर्धेत ४० किलो वजनी गटात ‘सुवर्णपदक’ मिळविले असून, २ ते १० मे दरम्यान भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. राष्ट्रीय पॅरॉलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून तिने दिंडनेर्लीबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे.जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर शुक्लाने पॅरॉलिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. पोलिओने पायावरती आघात केल्याने वय वाढेल तसे पायावरती उभे राहता येईना. भिंतीचा, घरातील व्यक्तींचा आधार घेत प्रयत्न करू लागली; पण काही उपयोग होईना. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आॅपरेशन केले. आॅपरेशननंतर कुबड्याच्या साहाय्याने चालू लागली. सोबतची मुले-मुली धावत शाळेत जायची; पण शुक्ला स्वत:च पायाकडे पाहत राहायची. हार न मानता तिने गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापुरातील एमएलजी कॉलेजमध्ये १२ वी केले. कागल येथे कृषी पदविका पूर्ण केली. यानंतर तिने जिल्हा अपंग संस्थेमध्ये काम केले. यावेळी तिच्यातील खिलाडूवृत्ती तिला बैचेन करीत होती. तिने संस्थेतच स्विमिंंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा पॅरॉलिम्पिकचे अध्यक्ष अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, आदी खेळांचा सराव करून स्पर्धांमध्ये विजय संपादित केला.सुवर्णपदकांचा इतिहास शुक्लाने रचला असून, तिच्या विजयात बिभिषण पाटील, अनिल पोवार, संजय पाटील, डॉ. दीपक जोशी, आर. डी. आळवेकर, वडील साताप्पा बिडकर यांचे सहकार्य लाभले. दिल्ली येथील स्पर्धेसाठीचा प्रवास खर्च खासदार धनंजय महाडिक यांनी केला. (वार्ताहर)
शुक्लाची कामगिरी
२०११ : यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेमध्ये २ सुवर्ण व १ रौप्यपदक.
२०१२ : बंगलोर येथे राष्ट्रीय स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्यपदक.
२०१३ : नागपूर येथे राज्यस्तरीय अॅथेलेटिकमध्ये १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्यपदक.
२०१४ : पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पॉवरलिफ्ंिटग स्पर्धेत कांस्यपदक.