शेण - भाग २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:25+5:302021-09-27T04:27:25+5:30
‘व्हॉट डज इट मीन?’ कन्यकेची गंभीर चेहऱ्यानंच शंका! ’तू पाजळलेलं अगाध ज्ञान बरोबर आहे... काऊडंग म्हणजेच गाईचं शेण हेही ...
‘व्हॉट डज इट मीन?’ कन्यकेची गंभीर चेहऱ्यानंच शंका!
’तू पाजळलेलं अगाध ज्ञान बरोबर आहे... काऊडंग म्हणजेच गाईचं शेण हेही बरोबरच आहे... मीही `शेण खाल्लं’ असं म्हटलं होतं हेसुद्धा बरोबरच आहे... पण ‘कुणीतरी शेण खाल्लं’ असं म्हटलं मी... बाबांनी खाल्लं, असं म्हटलं नव्हतं!’ गंधालीचा अक्षरश: विस्फोट!
‘सॉरी मा सॉरी... कन्फ्युजन झालं गं थोडं... ते तू म्हणतेस ना तसं इंग्लिश मीडियममुळं परफेक्टली कळलं नाही की प्रॉब्लेम होतो गं...’ लेकीची माघार!
’एवढी अक्कल आहे ना... मग खात्री करून घ्यावी आधी... त्याशिवाय पिल्लू सोडू नये वाट्टेल ते...’ गंधाली अजून स्थिरावली नसल्यानं संतापातच म्हणाली.
‘मॉम... मी ना परवा पालीची दोन पिल्लं बघितली आपल्या बेडजवळच्या खिडकीत’ इति चिरंजीव!
‘अरे, एक असेल तर पिल्लू... अनेक असतील म्हणजे प्लुरल असेल तर पिल्लं म्हणायचं’ असं गंधाली त्याला सुधारतेय तोवर, ‘ईsssssssssss..... मी नाही झोपणार आता तिथं...’ असं तिची कन्यका किंचाळली.
‘आज काय सगळीजणं पिल्लं सोडत बसणार आहात की जेवायलाही घालणार आहात?’ या विनीतच्या खोचक वाक्यावर क्षणार्धात गंधालीची विकेट जात संतापून ती म्हणाली, ‘एक्सक्यूज मी... सगळा स्वयंपाक तयार आहे... उलट आम्हाला थांबावं लागलं, तू तणतणत होतास फोनवर म्हणून...’
‘हां... ते शेण खाल्ल्यामुळं तेच ना गं आई?...’ या लेकीच्या वाक्यावर तिच्याही नकळत गंधाली अगदी वसकलीच, ‘बाबांनी नाही... कुणीतरी असं म्हटलं होतं मी...’
‘तेच... तेच गं... काय मिनिंग सांग ना त्याचं...’ लेक मऊपणे म्हणाली.
‘गाढवपणानं वागणं म्हणजे शेण खाणं... कळलं?’ असं गंधाली ओरडली तर त्यावर तत्त्ववेत्त्याचा आव आणत गंभीर चेहऱ्यानं तिची कन्यका म्हणाली, ‘व्हेSSSरी स्ट्रेंज... शेण इज रिलेटेड टु गाय... हाऊ कॅन अ गाढव एन्टर इन?’
आता गंधालीचा संयम पुरता सुटून ती लेकीवर करवादली, ‘आता तू जास्त शेण खाऊ नकोस... मुकाट जेवायला चल...’
‘मॉम... डोन्ट इन्सल्ट... आय ऍम अ रिस्पॉन्सिबल सिटिझन... आय डोंट ईट शेण ऍन्ड ऑल... ओके?’ लेकीतलं ‘टीन एज’ उफाळून आलं.
‘सारखे अपमान एक बरे होतात यांचे... आम्हाला कोण काळं कुत्रं पण विचारत नव्हतं या वयात... आणि अजूनही फार काही सुधारलेली नाहीये अवस्था’ या गंधालीच्या वाक्यावर मात्र मूळ मिश्कील स्वभावात परतत विनीत खळखळून हसला.
‘आई... कुत्र्याचं काय आता? वुई वेअर टॉकिंग अबाऊट गाय ॲन्ड गाढव ना?’ गंधालीच्या सुपुत्राची जिज्ञासा!
’काही नाही... मीच गाढव आहे म्हणून कुत्रं म्हणाले असेन...’ गंधालीनं शस्त्रं टाकली.
‘नो मॉम... यू आर गेटिंग कन्फ्युज्ड नाऊ... यू सेड सम फ्रेजलाइक थिंग...’ आता लेक विषय सोडत नव्हता.
‘हो... काळं कुत्रंही न विचारणे असा वाक्प्रचार आहे आमच्याकडं... महत्त्वाचं म्हणजे, आमच्या आधीच्या आणि नंतरच्या दोन्ही पिढ्यांच्या राज्यात आमची अवस्था तशीच आहे...’ गंधालीतल्या त्या क्षणातल्या उरल्यासुरल्या धुगधुगीनं एकदमच उचल खाल्ली.
‘मम्मा... ब्लॅक डॉग्ज लुक सो गॉर्जियस... आपण आणूया एक प्लीSSSज?’ वयाला साजेसं कन्यकेचा स्वप्नाळू डोळ्यांनी प्रश्न!
‘तिघांना सांभाळतेय ते कमी आहे म्हणून आता चौथं एक डोक्यावर घेऊ का?’ गंधालीचा निकराचा विरोध!
‘मॉम... वुई आर नॉट डॉग्ज... वुई कॅन हॅन्डल आवर ओन थिंग्ज...’ चिरंजीव!
‘पण करता का हॅन्डल? शेवटी मलाच धारातीर्थी पडावं लागतं ना तुमचे पसारे आवरत?’ गंधालीनं आत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा मांडला, ज्याची झळ फक्त तिलाच जाणवणं शक्य होतं.
‘ऐक मा... तू फक्त त्याचं शी-शू बघशील का? बाकी सगळं आम्ही दोघं हँडल करू...’ सुकन्या!
‘दोन बाळंतपणांत कंबरडं मोडलं... तिसरा व्याप मी मुळीच डोक्यावर घेणार नाही... मुकाट जेवा आता...’ पानं वाढून खुर्चीत बसत गंधाली म्हणाली.
‘आणि तसंही मॉम... ही म्हणाली तरी काही मदत करेल असं नाही... माझ्याकडून गोड बोलून काम करून घेत असते आणि मी काही सांगितलं तर तुझं तू कर असं ओरडते माझ्यावर...’ सुपुत्र!
‘लुक मा... ही इज पॉइझनिंग युवर माईंड...’ कन्यका आवेशात म्हणाली!
ते वाक्य मात्र अगदी असह्य होत गंधाली म्हणाली, ‘विषप्रयोग..???? अरे, कसले शब्द वापरता रे एकमेकांसाठी? दोघं सख्खी भावंडं आहात ना?"
यावर तिला दुजोरा द्यायचा सोडून विनीत खोखो हसत म्हणाला, ‘आता तुम्ही घोळ करताहात, राणीसरकार... मराठी मेडियममुळं...! शब्दश: अर्थ घेऊ नको गं पॉइझनिंगचा... आपण काडी टाकणं किंवा कळ लावणं म्हणतो ना, तितपत लाईटली घे!’
‘बाबा, काडी टाकणं म्हणजे?’ सदैव शिखरावरच जिज्ञासा असणारे चिरंजीव विचारते झाले.
यावर विनीतनं एक अक्षरही बोलायच्या आत त्याची कन्यका वदली, ‘ओय... इडियट... यू डोन्ट नो? काडी इज काडी... ती काडेपेटीमध्ये नसते का? ती टाकणे... आई नाही का उदबत्ती, निरांजन असं लावल्यावर फुफू करून मग ती काडी टाकून देत?’
‘त्याचं इथं काय लॉजिक?’ अशा लेकाच्या प्रश्नाचा अर्थही गंधालीच्या डोक्यात शिरला नाही... कारण तिच्या अख्ख्या मेंदूलाच आता कुणीतरी काडी लावल्यासारखं किंवा त्यावर शेण थापल्यासारखं तिला वाटू लागलं होतं.
विनीत मात्र प्रचंड पेशन्स ठेवून पोरांना कायकाय समजावून देत होता... ‘चालूदे, चालूदे’ असं एकीकडं मनातल्या मनात म्हणत असतानाही गंधालीला बोचत होतं ते मधेच त्याचं गालातल्या गालात तिच्याकडं बघून मिश्कील हसणं!