दुर्गाताई पिसाळ कोल्हापूर विभागातील पहिल्या पदवीधर 'तृतीयपंथी विद्यार्थी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 11:22 AM2021-12-13T11:22:12+5:302021-12-13T11:26:08+5:30
पिसाळ या समाजशास्त्र विषयातील प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूर विभागातील पहिल्या तृतीयपंथी विद्यार्थी ठरल्या आहेत.
कोल्हापूर : ‘शिक्षणामुळे व्यक्तीला दर्जाची व संधीची समानता प्राप्त होते. तृतीयपंथीयांनी शिक्षणाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबरच आर्थिक उन्नतीचे स्त्रोत निवडून भेद विरहित जीवन अंगीकारावे. शिक्षणच तृतीयपंथीयांना सन्मानाचे जगणे देईल, असे विचार आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मोहन गरगटे यांनी व्यक्त केले. ते महावीर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात दुर्गाताई रणजित पिसाळ या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान समारंभप्रसंगी बोलत होते.
महावीर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात तृतीयपंथीयांना पदवी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापैकी पिसाळ या समाजशास्त्र विषयातील प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूर विभागातील पहिल्या तृतीयपंथी विद्यार्थी ठरल्या आहेत.
यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात पिसाळ यांनी, मी व माझ्या समाजाने सहन केलेल्या वेदनांची प्रकर्षाने आठवण होते, यातून बाहेर पडण्याचा शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे. ही ज्ञानगंगा तृतीयपंथीयांच्या घरात पोहोचविण्यासाठी हे अभ्यासकेंद्र व विद्यापीठ अग्रेसर राहील याची खात्री आहे, असे प्रतिपादन केले. पोलीस दलात निवडीबद्दल बी. कॉम. विभागातील विद्यार्थिनी अश्विनी चौगले हिचा सत्कार केला.
केंद्रसंयोजक प्रा. डॉ. महादेव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर केंद्र सहायक प्रा. बसवराज वस्त्रद यांनी आभार मानले. प्रा. विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, निमंत्रक व विद्यार्थी उपस्थित होते.