दुर्गजोडी दुर्लक्षितच--साद गड किल्ल्यांची
By Admin | Published: December 26, 2014 10:02 PM2014-12-26T22:02:50+5:302014-12-26T23:54:33+5:30
किल्ले चंदन-वंदन
प्रशांत पिसाळ - पळशी--लोणावळ्याजवळील लोहगड-विसापूर या जोड किल्ल्यांप्रमाणेच कोरेगाव, वाई, सातारा या तालुक्यांच्या सीमेवर ‘चंदन-वंदन’ ही अनोखी दुर्गजोडी आहे. अनोख्या या दुर्गजोडी सध्या शेवटची घटका मोजत आहेत.
‘चंदन’ हा किल्ला कोरेगाव तालुक्यातील बनवडी हद्दीत तर ‘वंदन’ वाई तालुक्याच्या खोलवडीच्या हद्दीत येतो. हे किल्ले गिरीदुर्ग या प्रकारात मोडतात. या किल्ल्यांची उंची समुद्रसपाटीपासून १,१७१ मीटर आहे. भाडळी-कुंडल रांगेचा फाटा यापर्यंत रांगेमध्ये या गडांचा समावेश होतो.
या किल्ल्यांची उभारणी विजापूरच्या इब्राहिम आदिलशहा दुसरा याने इ.स. १६०० मध्ये केली. त्यानंतर इ. स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आण्णाजी दत्तो सुबनवीस यांच्या मदतीने स्वारी करून चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून घेतले. नंतर ६ आॅक्टोबर १७०१ रोजी हे किल्ले औरंगाजेबाने जिंकले. पुन्हा तो छत्रपती संभाजीनंतर ताराबाई परत १७०८ मध्ये हा शाहूंच्या ताब्यात आला. सन १७९० च्या महसूलविषयक नोंदीमध्ये ‘चंदन-वंदन’ किल्ल्याची विजापूर सुब्यातील परगना (मुख्यालय) अशी नोंद आहे. तेथील महसूल २१,६४४ रुपये होता. इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे सहज गेला. आदिलशहा राज्यातील एक महत्त्वाचा परगाना हा किल्ला होता.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा; पण शासनाकडून पूर्ण दुर्लक्षित झालेला हा किल्ला व त्यावरील ऐतिहासिक वास्तू हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्यावर गेल्यावर पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे प्रवेशद्वार पाहावयास मिळते. सध्या फक्त एकच बाजू शिला असल्याने येथे प्रवेशद्वार होते, हे समजते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेतल्यावर येथे चंदनेश्वराचे छोटे मंदिर बांधले. मुस्लीम शाहीच्या जास्तीत जास्त वेळ ताब्यात असलेल्या किल्ल्यावरील कोणत्याही मशिदीची व कबरीची मोडतोड महाराजांनी न करता त्या वास्तू तशाच ठेवल्या. आजही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर असलेला हजरत पीर दर्गावर आजही हजारो हिंदू-मुस्लीम लोक भक्तीने येतात. येथे उरूसही साजरा करतात.
मौल्यवान खजिना नामशेषाच्या मार्गावर
दगडी स्तंभ : प्रवेशद्वारावर पुढे गले की, एकावर एक रचलेले प्रचंड दगडीस्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. याच्या समोरच दर्गाची इमारत आहे.
पार : सुंदर नक्षीदार दगडावर एक मोठा व्यासपीठ वजा पार आढळतो. या पारावर बसून न्यायदान व तक्रारनिवारण करण्याचे काम पार पाडले जात होते.
कोठार : धान्य साठवणुकीसाठी दगडी बांधकाम करून कोठार केले होते. परंतु,ते सध्या ते पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.
दर्गाच्या मागे एक विहीर आहे. ती जास्त खोल नसून त्या विहिरीस चांगले पाणी आहे.