शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड सज्ज
By admin | Published: June 4, 2017 08:30 PM2017-06-04T20:30:33+5:302017-06-04T20:30:33+5:30
उद्यापासून कार्यक्रमांना सुरुवात; मंगळवारी मुख्य सोहळा; जिल्ह्यातून हजारो शिवभक्त रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे उद्या, मंगळवारी साजरा करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठीदुर्गराज किल्ले रायगड सज्ज झाला आहे. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येत आहेत. रविवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो शिवभक्त रवाना झाले. सोहळ्याची सुरुवात आज, सोमवारी दुपारी ४ वाजता गडपूजनाने होणार आहे. महोत्सव समितीतर्फे आज, सोमवार व उद्या, मंगळवार असे दोन दिवस शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेकाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी महोत्सव समिती आणि रायगड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. समितीतर्फे गडस्वच्छता मोहीम, सजावट, अन्नछत्राची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे प्राथमिक आरोग्यसेवा, पाणीपुरवठा व पार्किंग, इतर सुरक्षा यासह विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी दिली. प्रतिवर्षीप्रमाणे आज, सोमवारी दुपारी ४ वाजता गडपूजनाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव, स्थानिक प्रतिनिधी रघुवीर देशमुख, पंचक्रोशीतील गावकर यांच्यासह समितीचे व महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सदस्य व इतिहासप्रेमींच्या हस्ते गडपूजन, अश्वपूजन, शस्त्रास्त्रपूजन आदी कार्यक्रम नगारखाना येथे होणार आहेत. यानंतर राजदरबारात शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके होतील. यामध्ये राज्यभरातून आलेले मावळे व रणरागिणी विविध शस्त्रास्त्रे चालविण्याची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
असे होणार कार्यक्रम
सोमवारी दुपारी ४ वाजता गडपूजनाने सोहळ्याला सुरुवात होणार आहे. महादरवाजाला तोरण, शिरकाईदेवीचा गोंधळ, शाहीर, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रम होणार आहेत, तसेच दुर्गसंवर्धनासाठी राज्यभरात काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि शिवभक्तांचा सायंकाळी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
‘संवर्धन रायगडाचे...मत शिवभक्तांचे’ चर्चासत्र
‘रायगड’च्या संवर्धन व विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे. त्याचा शासनाकडून विकास आराखडा तयार झाला असून यावर महाराष्ट्रातील शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक, पर्यावरणप्रेमी, प्रशासन, स्थानिक रहिवाशी यांच्या मतांचा अभ्यास करून रायगड संवर्धन व विकास आराखडा तयार करण्यात आला तर तो जास्त प्रभावशाली होईल. त्यासाठी आज, सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ‘संवर्धन रायगडाचे...मत शिवभक्तांचे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील सूचना व बदल ऐकून घेऊन त्यानुसार आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत, अशा सूचना संभाजीराजे छत्रपती राज्य व केंद्र सरकारकडे करणार आहेत.
कोल्हापुरातून शिवभक्त रवाना
कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्तांनी भरलेल्या, भगवे झेंडे व शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे फलक लावलेल्या चारचाकी गाड्या रायगडकडे रवाना झाल्या. रात्री साडेनऊच्या सुमारास दसरा चौक येथून शहरातील शिवभक्त रवाना झाले. जय भवानी...जय शिवाजी..., छत्रपती शिवाजी महाराज की जय...अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला.