अडचणीच्या काळात, कोरेंची युतीला साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:35 AM2019-05-25T10:35:21+5:302019-05-25T10:39:02+5:30
कोल्हापूर : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली ताकद कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या उमेदवारांमागे ...
कोल्हापूर : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली ताकद कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या उमेदवारांमागे लावल्याने या विजयामध्ये आपलाही वाटा आहे, असा दावा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
कोरे यांच्या पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघांतच त्यांची विधानसभेची लढाई शिवसेनेच्या सत्यजित पाटील-सरुडकर यांच्याशी असल्याने लोकसभेला पाठिंबा जाहीर करण्याची घाई विनय कोरे यांनी केली नव्हती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक, संजय मंडलिक, राजू शेट्टी, निवेदिता माने या सर्वांनीच कोरे यांची भेट घेऊन दोन्ही मतदारसंघांमध्ये पाठिंब्यासाठी विनंती केली होती.
परंतु आपल्याच विरोधातील चिन्ह आपण आता कसे पोहोचवायचे असा यक्षप्रश्न कोरे यांच्यासमोर होता. अखेर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूट दिल्यानंतर बहुतांश कार्यकर्ते हातकणंगले मतदारसंघामध्ये माने यांच्या; तर कोल्हापूर मतदारसंघामध्ये मंडलिक यांच्या पाठीशी राहिले. कोरे यांचे काही कार्यकर्ते शेट्टी यांच्याही पाठीशी राहिल्याचे सांगितले जाते. कोरे यांच्या या भूमिकेमुळे मंडलिक आणि माने यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुलभ होण्यासाठीही मदत झाली. दरम्यान, विधानसभेवेळी मात्र कोरे जरी युतीतील घटकपक्ष असले तरी त्यांच्यामध्ये आणि सत्यजित पाटील यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.