शाहू महाराजांच्या काळात होत्या चित्त्यांच्या वसाहती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:36 AM2020-03-16T06:36:59+5:302020-03-16T06:39:09+5:30

कोल्हापुरात संस्थानात होते ३५ चित्ते; विक्रम हायस्कूलजवळ अजूनही चित्तेखाना, शहर परिसरात राहतात चित्तेवान

During the era of Shahu Maharaj, there were colonies of Chitta in Kolhapur | शाहू महाराजांच्या काळात होत्या चित्त्यांच्या वसाहती

शाहू महाराजांच्या काळात होत्या चित्त्यांच्या वसाहती

googlenewsNext

- संदीप आडनाईक
कोल्हापूर : भारतातून चित्ता आज नामशेष झाला असला तरी पूर्वी उत्तर आणि दक्षिण भारतातील संस्थानांमध्ये चित्ता पाळला जायचा. इतकेच नव्हे तर केवळ काळविटाची शिकार करण्यासाठी त्यांना माणसाळविले जायचे. त्यासाठी कोल्हापूर संस्थानात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी चित्त्यांच्या वसाहती स्थापन केल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील विक्रम हायस्कूलजवळ अजूनही चित्तेखाना (चित्ता कारखाना) पाहायला मिळतो.
आफ्रिकन चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०२० रोजी हिरवा कंदील दिल्यामुळे भारतातून नामशेष झालेल्या या वेगवान प्राण्याची डरकाळी पुन्हा घुमणार आहे. चित्ता हा (अ‍ॅसिनोनिक्स जुबेटस) मांसाहारी वन्य प्राणी असला तरी बिबट्या आणि चित्ता यांच्यात मूलभूत फरक आहे. बिबट्या रात्री शिकार करतो, तर चित्ता दिवसा. तो भित्रा पण प्रामाणिक प्राणी आहे; त्यामुळेच त्याचा शिकारीसाठी उपयोग करुन घेतला जात असे. उत्तर भारतात जयपूर, घोलपूर, भरतपूर, दक्षिणेत हैदराबाद, म्हैसूर, कोल्हापूर, जमखंडी, मुधोळ, फलटण, गुजरातमध्ये भावनगर, बडोदा या संस्थानांमध्ये चित्ते पाळून त्यांच्याकडून शिकार करवून घेतली जात होती. त्यात कोल्हापूर संस्थानाचा उल्लेख सर्वांत वरचा होता. संस्थानात ३५ चित्ते होते. याची नोंद टॅक्सीडर्मिस्ट बोथा व्हॅन इनगेन यांनी ठेवली आहे. त्यांनी १९३६ मध्ये कोल्हापूरला भेट दिली होती. वीरमती, लक्ष्मी, गणप्या, स्टार, भवानीशंकर अशी चित्त्यांची नावे होती, अशी माहिती गणेश नेर्लेकर-देसाई यांनी शिकारी चित्ता आणि चित्तेवान पुस्तकात नमूद केली आहे.
विद्यार्थिदशेत राजकोट येथे शिक्षण घेत असताना शाहू महाराजांनी त्यांचे सहाध्यायी भावनगरचे राजे भाऊसिंहजी महाराज यांच्याकडे भावनगर येथे चित्त्यांकडून केलेली शिकार पाहिली आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानात चित्त्यांची शिकार सुरू केली. त्यासाठी कोल्हापुरातील लोकांना आफ्रिकेत पाठवून शिकारीचे प्रशिक्षण दिले. अशा शिकारी छत्रपती राजाराम महाराज यांच्यापर्यंत १९४० पर्यंत जपल्या गेल्या. १९४० पर्यंत हे रॉयल स्पोर्ट जपणारे कोल्हापूर हे एकमेव संस्थान होते, अशी माहिती लीलावती दौलतराव जाधव यांनी लिहिलेल्या ‘शिकारी चित्ता आणि चित्तेवान’ या पुस्तकात नमूद आहे.
संस्थानात बालेखाँ चित्तेवान, सरदारखाँ चित्तेवान, चॉँदसाहेब जमादार, इस्माईल रहिमान जमादार, धोंडी लिंबाजी पाटील, येकू बाळा घोरपडे, हनीफ बालेखाँ जमादार, बाबूलाल उस्मान चित्तेवान, तुकाराम चेद्राप्पा बोडके, मोहीद्दीन बाबाजी शेख, बडे भाई, हुसेन रहिमान जमादार, आबालाल मीरा फकीर, नारू शंकर मांग, कमाल अब्दुल चित्तेवान, बिरू रामा धनगर, नुरुल्लाखान हुसेनखान पठाण असे चित्तेवान होते.
 

Web Title: During the era of Shahu Maharaj, there were colonies of Chitta in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.