दुष्काळातही कोल्हापूरकरांच्या गाड्या सुसाटच
By admin | Published: May 28, 2016 12:34 AM2016-05-28T00:34:55+5:302016-05-28T00:48:55+5:30
वाहन विक्रीचा वेग कायम : ‘प्रादेशिक परिवहन’कडे एका महिन्यात ७८६८ दुचाकींची नोंद
सचिन भोसले -- कोल्हापूर --कोल्हापूरकर आणि त्यांच्या गाड्यांच्या प्रेमाबद्दलचे कौतुक राज्यात सर्वश्रुत आहे. राज्यात एका बाजूला दुष्काळी परिस्थितीमुळे वाहनांसह अन्य वस्तूंच्या खरेदीचा वेग मंदावला आहे. मात्र, कोल्हापूर याला अपवाद ठरत आहे. केवळ एप्रिल महिन्यात ७८६८ इतक्या दुचाकी नव्याने रस्त्यावर आल्या आहेत. दर महिन्यात सरासरी ९००० इतक्या दुचाकी विक्रीच्या जवळपासच ही आकडेवारी असल्याने दुष्काळातही कोल्हापूरकरांच्या गाड्या सुसाटच म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
कंपन्यांनी बाजारात आणलेल्या नव्या गाड्यांच्या पहिल्या लॉटमधील गाडी कोल्हापूरच्या रस्त्यावर येतेच. याकरिता आगाऊ पैसे भरून का असेना, त्या गाडीचे आरक्षण करणारे अनेक हौशी या जिल्ह्यात आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच सधन असलेल्या व पाण्याचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातही दुष्काळाच्या झळा कमी-जास्त प्रमाणात बसत आहेत. तरीही कोल्हापूरकरांचे वाहनप्रेम मात्र काही केल्या कमी होत नाही. एप्रिल महिन्यात सर्व प्रकारच्या ९३७९ वाहन खरेदीपैकी ७८६८ इतक्या दुचाकींची नोंद नव्याने झाली आहे. त्यातून मागील महिन्यांतील नोंद झालेल्या गाड्यांची आकडेवारी पाहता ती सरासरी इतकीच आहे. याशिवाय चारचाकी गाड्याही नेहमीच्या वेगानेच रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. ९८५ चारचाकी वाहने गेल्या महिन्यात रस्त्यांवर नव्याने दाखल झाली आहेत. महिन्याकाठी किमान एक हजार चारचाकी वाहने रस्त्यावर येतात.
वाहनवाढीचा वेग पाहता, सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० लाख ७३ हजार १४५ वाहनांची कागदोपत्री नोंद आहे. यात नव्याने महिन्याकाठी सरासरी आठ ते नऊ हजार नव्या वाहनांची भर पडत आहे. दोन्ही बाजूंनी जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येक ‘दोन माणसी एक वाहन’ असे गणित आहे. त्यामुळे दुष्काळ असो वा सुकाळ; कोल्हापूरकरांच्या गाड्या सुसाटच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
यंदा दुष्काळी स्थिती असूनही एप्रिल महिन्यात १८२ नवीन ट्रॅक्टर व ७० ट्रेलरची नोंद प्रादेशिक परिवहन खात्याकडे झाली आहे.