‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:45 PM2023-09-05T12:45:06+5:302023-09-05T12:45:59+5:30
महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार
इचलकरंजी : राज्यातील आघाडी सरकार हे स्थगिती देणारे सरकार होते, तर आता गतिमान सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळात एकही मोर्चा निघाला नाही. तसेच कोणी आत्महत्या करण्याचा इशारा दिला नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतरच ते कसे घडते? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. शहरातील भारतीय जनता पक्ष कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून नावलौकिक मिळवावा तसेच केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
येथील भाजप कार्यालय नूतनीकरण उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक म्हणाले, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याची माहिती जनतेला नाही. ही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. कोरोनामुळे अनेक देश डबघाईला आले असताना भारत देशाने अकराव्या स्थानावरून पाचवे स्थान प्राप्त केले.
खासदार माने म्हणाले, भाजप हे शिस्तीचे विद्यापीठ आहे, तर शिवसेना मुक्त विद्यापीठ आहे. शिस्तीला महत्त्वाचे स्थान आहे. पडत्या काळात पक्षासोबत जे राहिले, ते सच्चे कार्यकर्ते आहेत. सध्या राज्यात त्रिशंकू सरकार आहे. ते तिप्पट वेगाने आणि गतीने पुढे जात आहे.
हाळवणकर म्हणाले, शहरात चांगली बूथरचना भाजपने उभी केली आहे. हे कार्यालय सेवेचे मंदिर बनणार आहे. सुरुवातीला शाहू पुतळा ते भाजप कार्यालय अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महाडिक यांनी कार्यालयाचे उद्घाटन आणि भारत मातेच्या प्रतिमेचे अनावरण केले. शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी स्वागत केले. कार्यक्रमास राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहाजी भोसले, अशोक स्वामी, अलका स्वामी, मिश्रीलाल जाजू, भाऊसाहेब आवळे, रिषभ जैन, ॲड. भरत जोशी, दीपक पाटील, अमृत भोसले यांच्यासह माजी नगरसेवक, बूथप्रमुख, शक्तीप्रमुख उपस्थित होते.
भाजप-शिवसेनेचा महापौर
महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिले नगरसेवक होण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीचा पहिला महापौर इचलकरंजी महापालिकेत होईल, असा विश्वास हाळवणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.