कोरोनाकाळात केंद्र, राज्य सरकारकडून मदतीचा हात, जिल्ह्यात दीड लाख निराधारांना योजनांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 11:53 AM2022-01-20T11:53:38+5:302022-01-20T11:54:01+5:30
गेल्या वर्षभरात सर्वच क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागलेली असताना जिल्ह्यातील निराधार नागरिकांना योजनांनी दिला मोठा आधार.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोरोनामुळे नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असताना निराधार, दिव्यांग, विधवा आणि वृद्धांसाठी शासनाच्या योजनांची संजीवनी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात डिसेंबर २०२१ पर्यंत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ, दिव्यांग, विधवा योजना या पाच योजनांच्या माध्यामातून जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ७१९ निराधारांना तब्बल ११९ कोटी ९७ लाख १४ हजार १०२ इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यातील निराधार नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी सर्वसाधारण-अनुसूचित जाती व श्रावणबाळ सर्वसाधारण-अनुसूचित जाती या दोन योजना राबवल्या जातात तर केंद्राच्या वतीने इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग या तीन योजना राबवल्या जातात. या दोन्ही योजना मिळून एका व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. गेल्या वर्षभरात सर्वच क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागलेली असताना जिल्ह्यातील निराधार नागरिकांना या योजनांनी मोठा आधार दिला आहे.
कसा कराल अर्ज?
कोणत्या याेजनेखाली आपल्याला अर्थसाहाय्य हवे आहे त्याचा छापील अर्ज मिळतो. या अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, अनुसूचित जातीचा असेल तर जातीचा दाखला, लाभार्थीचा व मुलांचा वयाचा दाखला ही कागदपत्रे तालुक्याच्या ठिकाणी सादर करावी लागतात. प्रत्येक तालुक्याला नऊ सदस्यांची एक समिती असते. ही समिती व तहसीलदारांकडून या अर्जाचा विचार करून तो मंजूर किंवा नामंजूर केला जातो. त्याआधी लाभार्थीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाते.
..या आहेत अटी
वरीलपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वार्षिक उत्पन्न २१ हजारांच्या आतच असले पाहिजे. अपंगत्व असेल तर किमान ४० टक्के अपंगत्व असावे, विधवा स्त्रीच्या मुलाचे वय २५च्या आत हवे, दिव्यांग व्यक्ती असेल तर उत्पन्नाची अट ५० हजारांपर्यंतची आहे. श्रावणबाळ योजनेसाठी किमान ६५ वय पूर्ण हवे.
किती रुपयांची मिळते मदत
राज्य शासनाची व केंद्र शासनाची अशा दोन योजना मिळून एका व्यक्तीला महिन्याला साधारण एक हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य मिळते.
कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी
तालुका | संजय गांधी योजना | श्रावणबाळ योजना | इंदिरा गांधी वृद्धापकाळ | इंदिरा गांधी विधवा | इंदिरा गांधी दिव्यांग योजना |
कोल्हापूर उत्तर | ३ हजार ३६० | २१७३ | ४१६ | ३० | ० |
कोल्हापूर दक्षिण | ७ हजार १३७ | १२ हजार ७३२ | २ हजार ५६४ | ५७ | ७ |
कागल | ४ हजार ४ | ८ हजार ८६० | ३ हजार ४५० | २७७ | २० |
पन्हाळा | २ हजार १२९ | १ हजार ४५९ | ६६९ | ५१ | ११ |
शाहूवाडी | १ हजार ५५९ | ८३६ | ३१० | ४५ | ९ |
हातकणंगले | ४ हजार ७५९ | ५ हजार ५८८ | २ हजार २३ | ४०३ | १५ |
इचलकरंजी | ६ हजार २१३ | १० हजार ८५६ | ३ हजार ३६९ | ५२३ | १ |
शिरोळ | ५ हजार ७३१ | ११ हजार ४८९ | ३ हजार १२९ | ३२७ | २१ |
राधानगरी | २ हजार ३१६ | ४ हजार २८ | २ हजार ३७५ | १५६ | १८ |
भुदरगड | १ हजार ८३७ | ४ हजार १५३ | १ हजार १०३ | ७ | ४ |
गगनबावडा | ३६७ | ५९५ | २५९ | ५ | १ |
गडहिंग्लज | ४ हजार ९५८ | ४ हजार १९४ | ६५५ | ७६ | २४ |
आजरा | २ हजार २०७ | ८६५ | ८२७ | ६० | ११ |
चंदगड | २ हजार ९९१ | १ हजार ४४० | ५२१ | ४७ | ७ |
एकूण | ४९ हजार ५६८ | ६९ हजार २६८ | २१ हजार ६७० | २ हजार ६४ | १४ |