गणेश आगमन मिरवणुकीत लेसर लाईटचा झगमगाट, अनेकांचे मोबाईल झाले खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 11:29 AM2022-09-02T11:29:23+5:302022-09-02T11:29:57+5:30
अनेकांच्या डोळ्यातून पाणी येणे, चुरचुरणे आणि काहीजणांना अंधुक दिसणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
कोल्हापूर : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाईटसह साऊंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाईट आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाईल खराब झाले. अनेकांच्या डोळ्यातून पाणी येणे, चुरचुरणे आणि काहीजणांना अंधुक दिसणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
राज्य शासनाने यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटविल्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यात लेसर लाईट तर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. एका मंडळाने आणली म्हणून दुसरे मंडळही त्याच प्रकारचा झगमगाट करण्यात मागे राहिले नाही. हा रंगीबेरंगी झगमगाट आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैंद करून ते आपल्या स्टेटसला लावण्याच्या मोहापायी अनेकांना झटका बसला. अनेकांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातील लेन्स आणि सेंसरवर लेसर किरण थेट पडल्यामुळे ते बंद झाले, तर गुरुवारी सकाळी मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हा झिंगाट उतरल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी येणे, लाल होणे, चुरचुरणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागले.
लेसर किरणांमुळे लेन्स सेन्सर होते डॅमेज
मोबाईल कॅमेऱ्यामधील लेन्सची हालचाल होण्यासाठी आयसी सेन्सर्स असतात. त्या सेन्सरवर थेट तीव्र प्रकाशाची लेसर किरणे पडली तर ते जळून जातात. त्यानंतर डिस्प्ले स्क्रीनवर उभी रेष येते आणि कॅमेरा कार्य करीत नाही. असे मोबाईल दुरुस्तीसाठी यापूर्वीही आले होते, अशी माहिती मोबाईल दुरुस्ती तज्ज्ञ तौसिफ शेख (मोबाईल मास्टर) यांनी दिली. या मोबाईल दुरुस्तीचा खर्च एक ते दहा हजार रुपये येतो असे मत मोबाईल दुरुस्ती तज्ज्ञ धीरज पाटील यांनी सांगितले.
लेसर किरणे डोळ्यातील रेटिनावर जादा काळ राहिली तर त्याचा परिणाम आपल्या दिसण्यावर होऊ शकतो. डोळा हा सुद्धा एक नॅचरली ऑप्टिकल सिस्टिम आहे. शक्यतो ही किरणे हवेत सोडावीत चेहऱ्यावर घेऊ नयेत. ती जादा काळ डोळ्यात गेल्यानंतर इजा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. अभिजित ढवळे, नेत्ररोग तज्ञ, कोल्हापूर