दिवाळी पहाटने कोल्हापुरातील रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:07 PM2017-10-19T17:07:16+5:302017-10-19T17:11:32+5:30
राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली.
कोल्हापूर , दि. १९ : ‘राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली.
गुणीदास फौंडेशनच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक उपस्थित होत्या. संगीत मैफलीची सुरुवातच जसरंगी रागाने झाली. त्यानंतर यशस्वी सरपोतदार यांनी ‘रामरंगी रंगले...’ हे गीत सादर केले.
आदित्य मोडक यांच्या ‘पाखरा जा...’ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सादर झालेल्या ‘खरा तो प्रेमा...’, ‘या भवनातील...’, ‘बोलावा विठ्ठल...’, ‘पियाजी म्हारे...’, ‘येथे कारे उभा...’, ‘सावरे....’ अशा गीतांनी रसिकांची दिवाळी पहाट अधिक आनंददायी झाली.
भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना राजप्रसाद धर्माधिकारी (तबला), सौरभ शिपूरकर (हार्मोनियम), केदार गुळवणी (व्हायोलिन), सचिन जगताप (बासरी), विक्रम पाटील (की बोर्ड), राजनाथ शिर्के (पखवाज), स्वप्निल साळोखे (रिदम) यांची साथसंगत लाभली. महेश्वरी गोखले यांनी निवेदन केले.