जिल्ह्यातील १००२ संस्थांचा सोमवारपासून धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:41+5:302021-02-11T04:25:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : पहिल्या टप्यातील १००२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा सोमवार (दि. १५)पासून उडणार आहे. ‘गोकुळ’, जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : पहिल्या टप्यातील १००२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा सोमवार (दि. १५)पासून उडणार आहे. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेचा समावेश असून हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय दुसरा टप्यातील निवडणुकांची प्रक्रिया सुरू करू नये, असे स्पष्ट आदेश बुधवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
राज्य शासनाची कर्जमाफी योजना व त्यानंतर कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने तयारी केली आहे. सहा टप्प्यांत निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १००२ संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सोमवारपासून या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये ‘ड’ वर्गातील सर्वाधिक ५९४ संस्थांचा समावेश आहे. पहिला टप्या संपल्याशिवाय दुसऱ्या टप्यातील संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करता येणार नसल्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात ‘गोकुळ’, जिल्हा बँकेसह ‘अ’ वर्गातील दहा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ‘क’ वर्गातील १७६ संस्थांच्या निवडणुका होणार असून यामध्ये ८५ दूध संस्थांचा समावेश आहे.
मे महिन्यात दुसरा टप्पा
पहिला टप्पा पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या टप्यातील निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. पहिल्या टप्यातील संस्थांची संख्या पाहता, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर मे २०२१ पासून दुसरा टप्पा सुरू होऊ शकतो.
वर्गनिहाय निवडणुका लागलेल्या संस्था
वर्ग संस्थांची संख्या
अ १०
ब २२२
क १७६
ड ५९४
प्रमुख संस्था :
जिल्हा बँक
गोकुळ,
कोल्हापूर जिल्हा शेतकरी सूतगिरणी, यड्राव
राजीवजी सूतगिरणी, कोल्हापूर
आण्णाभाऊ आजरा सूतगिरणी, आजरा
हातकणंगले सूतगिरणी, वाठार
इंदिरा गांधी महिला सूतगिरणी, इचलकरंजी
डॉ. डी. वाय. पाटील, साखर कारखाना, गगनबावडा
शरद साखर कारखाना, नरंदे
दत्त साखर कारखाना, आसुर्ले-पोर्ले