धूळ, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

By Admin | Published: March 25, 2015 11:46 PM2015-03-25T23:46:35+5:302015-03-26T00:03:29+5:30

लोकमत आपल्या दारी

Dust, bad health risks | धूळ, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

धूळ, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

googlenewsNext

भारत चव्हाण/प्रदीप शिंदे - कोल्हापूर रंकाळा तलावातील पाण्याची दुर्गंधी आणि रंकाळा टॉवर ते तांबट कमानीपर्यंतच्या रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धूळ व दुर्गंधीने आजारी पडून नागरिक अक्षरश: वैतागलेले आहेत. बुधवारी शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक आणि संध्यामठ गल्ली येथे जाऊन ‘लोकमत’ने तक्रारी ऐकून घेतल्या. तेव्हा महानगरपालिकेच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रहिवाशांच्या आरोग्यावर उठलेला हा रस्ता होणार तरी कधी हे एकदा जाहीर करावे, असा सवाल त्यांनी विचारला.
शिवाजी पेठेतील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, कचरा उठाव याबाबत नागरिकांच्या तक्रारी फारशा दिसत नाहीत. स्वच्छता, कचरा उठाव नियमित होतो. अधून-मधून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सोडला तर पाण्याचीही समस्या नाही; परंतु रंकाळा तलावाची दुर्दशा आणि टॉवर ते तांबट कमान या रस्त्याचे रखडलेले काम शिवाजी पेठेच्या नागरिकांना त्रासदायक ठरले आहे. या दोन समस्यांमुळे नागरिकांचे स्वास्थ हरवून गेले आहे. चार वर्षे नागरिक या समस्येचा सामना करत आहेत.
रंकाळा तलावाची दुर्गंधी केवळ काठावर राहणाऱ्या नागरिकांनाच सतावत नाही, तर संपूर्ण परिसराला भेडसावत आहे. साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, सरदार तालीम, मरगाई गल्ली, राजे संभाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, वेताळमाळ परिसरात ही दुर्गंधी पसरते. दुर्गंधीमुळे डास, चिलटे तयार होतात. येथील वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होते. दिवसभर धुळीने घरं भरून जातात. नाका-तोंडात धूळ जाऊन श्वसनाचे व घशाचे विकार जडले आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रंकाळ्याभोवतीचा रस्ता केला नसल्याने त्या मार्गावरील वाहतूक जुना वाशीनाका ते उभा मारुती चौक या रस्त्यावर वळली गेली आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडला आहे. लहान शाळकरी मुले या वाहनांच्या गर्दीतूनच धोकादायक प्रवास करत असतात.
गांधी मैदानाच्या दुरवस्थेवरही नागरिकांनी परखडपणे मते मांडली. पावसाळ्यात मैदानाला तळ्याचे स्वरूप येते. मैदानाची लेव्हल बिघडते. उन्हाळ्यात हे मैदान म्हणजे मद्यपींचे आणि पार्ट्या करणाऱ्यांना पर्वणीच ठरते. मैदानाची दुरवस्था संपवून सुसज्ज करावे, असे खेळाडूंना वाटते.

संरक्षण कठड्याची उंची वाढवा
रंकाळा तलावाच्या काठचा रस्ता करण्यासाठी भराव टाकला गेला असल्याने मूळ रस्ता उंच होऊन संरक्षण कठड्याची उंची कमी झाली आहे. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध तलावात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावाच्या आतील बाजूने दगडी भिंतीत पिंपळाची झाडे उगवली आहेत. त्यामुळे भिंतीचे दगड निखळून भिंत कमकुवत होत आहे. त्यामुळे ही झाडे तातडीने काढावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.


कॅमेरे लावा
शाळेच्या रस्त्यांवर अनेक रिकामटेकडी मुले फिरत असतात. शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास या रिकामटेकड्यांवर योग्य कारवाई करता येईल.
- तृप्ती सावंत, शाहीर
खडीचा उठाव करा
रस्त्याच्या कामांसाठी या ठिकाणी खडी, डांबर पडलेले आहे. त्याचे काम नाही. या खडीचा उठाव होत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रस्ते लवकरात लवकर करून ही खडी उचलावी.
- बाबूराव साठे
अंतर्गत रस्ते व्हावेत
या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची मोठी समस्या आहे. येथे आधीच लहान-लहान गल्ल्या आहेत. त्यामध्ये रस्ते खराब असल्याने वाहने चालविताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
- सुरेश पाटील
पाणी बाहेर काढावे
रंकाळा म्हणजे कोल्हापूरचा अलंकार होय. मात्र, याच अलंकाराची सांडपाण्यामुळे मोठी दुर्दशा झाली आहे. रंकाळ्यातील सर्व पाणी बाहेर काढून त्याची डागडुजी करावी.
- युवराज साळोखे
घंटागाडी दोनवेळा यावी
कचराकुंडी नसल्याने कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न येतो. त्यामुळे भागात सकाळी व सायंकाळी या दोन वेळेला घंटागाडी फिरल्याने कचरा टाकण्याची समस्या कमी होईल.
- प्रतीक पाटील
वाहतुकीची मोठी कोंडी
उभा मारुती चौकात मोठ्या प्रमाणात सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात यावेत.
- दिलीप सावंत, शाहीर
रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
संध्यामठ ते साने गुरुजी वसाहत रस्त्याचे काम कित्येक वर्षांपासून काम सुरू असल्याने या ठिकाणी नेहमी धुळीचे साम्राज्य असते. यामुळे डोळ्यांचे, श्वसनाचे विकार होण्याची शक्यता मोठी आहे.
- रमेश पाटील
सांडपाण्याचे नियोजन करा
रंकाळ्यात दररोज साने गुरुजी वसाहत येथील सांडपाणी मिसळते. या सांडपाण्याचे नियोजन केल्यास नक्कीच रंकाळ्यातील प्रदूषण रोखता येईल.
- दिगंबर लोहार
दुर्गंधीचा त्रास
पद्माळा गार्डनपासून संध्यामठपर्यंतच्या गटारी वेळच्या वेळी साफ केल्या जात नसल्याने यामध्ये कचरा तुंबल्याने भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते.
- मनोहर साळोखे
डासांचे साम्राज्य
प्रभागात डासांचे साम्राज्य वाढले आहे. वेळच्या वेळी गटारी साफ करून औषध फवारणी करण्यात यावी. यामुळे साथीचे रोग पसरणार नाहीत.
- संजय धावरे
दिशादर्शक फलक लावा
गगनबावडा व राधानगरीमार्गे मोठ्या प्रमाणात पर्यटक कोल्हापुरात येतात. मात्र, या ठिकाणी कुठेच दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांना अंबाबाई मंदिर, शिवाजी विद्यापीठ, आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पत्ता विचारावा लागतो.
- सुरेश माळी
प्रदूषण रोखा
रंकाळ्यातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी. तसेच नागरिकांनी रंकाळा प्रदूषण होऊ नये, यासाठी नियोजन करावे.
- सुरेश पोवार
रस्ता व्हावा...
रंकाळा टॉवर ते जुना वाशीनाका रस्त्याचे काम कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे हे काम जलद करण्यात यावे.
- पप्पू नलवडे
मैदानाची दुरवस्था
गांधी मैदानात दररोज सकाळी व सायंकाळी खेळण्यासाठी खेळाडूंची मोठी संख्या असते. मात्र, पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने मैदानाची दुरवस्था होत आहे.
- मुकुंद मोरे
कोंडाळा साफ होत नाही
वेळच्या वेळी कोंडाळा साफ होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे दररोज कोंडाळा साफ करून औषध फवारणी केली पाहिजे.
- वंदना पाटील
प्रशासनाचे दुर्लक्ष
गांधी मैदानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात मैदानात दलदल होते. त्यामुळे पावसाळा झाला की, पुन्हा मैदान सपाटीकरणासाठी पैसे खर्च करावे लागतात. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- राजाराम खाडे

 

Web Title: Dust, bad health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.