धरू की सोडू ?
By admin | Published: December 2, 2015 01:01 AM2015-12-02T01:01:47+5:302015-12-02T01:16:11+5:30
सुपरहिट जयाभाव.. मला नका हो धरू..
‘थोरले काका बारामतीकर’ यांनी ‘मध्यावधी निवडणुकां’चं भविष्य वर्तविताच भल्या-भल्यांची कुंडली एका रात्रीत डळमळीत झाली. काही विद्यमान आमदारांना ‘आपले ग्रह फिरले की काय?’ असा क्षणभर भास जाहला, तर भावी अन् माजी आमदारांना ‘साडेसाती संपली वाटतं!,’ असा साक्षात्कार झाला. खरंतर, ‘बारामतीकर जे बोलतात ते करत नसतात किंवा जे करतात ते अगोदर बोलत नसतात,’ असा त्यांच्यावर अनेक विरोधकांचा ठाम आरोप होता. मात्र, ‘भविष्यात जे घडणार असतं, ते सर्वात अगोदर केवळ आमच्या साहेबांनाच कळतं!’ यावर मात्र त्यांच्या तमाम श्रद्धाळू भक्तांची प्रचंड श्रद्धा होती. ‘आगामी काळात घड्याळ अन् हात पुन्हा एकत्र येणं, ही काळाची गरज आहे!’ असाही अचूक अंदाज भविष्य वर्तविताना त्यांनी स्पष्ट केला होता. त्यानुसार तसा निरोपही म्हणे सर्वत्र गेलेला. खरंतर, निवडणुकांच्या काळात ‘कामाला लागा!’ असा द्विअर्थी निरोप ज्या बारामतीतून निघायचा, तिथून यंदा चक्क ‘एक व्हा !’चा खलिता गावोगावी धाडला गेला. एक पोस्टमन हे सारे खलिते घेऊन सातारा जिल्ह्यातील काही नेत्यांच्या घरी धडकला...अन् त्या ठिकाणी जी काही गमाडी-जंमत झाली, ती जश्शीच्या तश्शी मायबाप वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न...बारामतीतून निघालेला पोस्टमन थेट फलटणच्या वाड्यावर थडकला. ‘परक्या पालकमंत्र्याच्या अनुपस्थितीत पोरक्या झालेल्या जिल्ह्याला आधार कसा द्यायचा?’ या गहन विचारात असलेल्या राजेंना पोस्टमननं ‘खलिता’ दिला. एका पायावर टाकलेला दुसरा पाय नेहमीप्रमाणं हलवत राजेंनी विचारलं, ‘कायऽऽ?’ पोस्टमननं मोठ्या आदबीनं सांगितलं, ‘मोठ्या साहेबांचा आदेश. एक व्हा!’ हे ऐकताच राजे आश्चर्यचकित झाले. ‘पण आम्ही तिन्ही भाऊ तर एकच आहोत. पिंटूबाबा पालिकेत, संजूबाबा झेड्पीत अन् मी अख्ख्या जिल्ह्यात.. एवढीच काय ती कामाची वेगवेगळी वाटणी.’ असं राजेंनी सांगितल्यावर मात्र पोस्टमननं पूर्ण निरोप पोहोचविला, ‘साहेबांचा निरोप.. तुम्ही अन् कऱ्हाडचे हातवाले एक व्हा!’ हे ऐकून राजे अस्वस्थ झाले. ‘दोन साडू एक होणे कदापिही शक्य नाही!,’ असं सांगताना त्यांनी हळूच सुरवडीच्या माळरानावरचे काही फोटो मात्र पोस्टमनला ‘परत टपाली’ पाठविण्यास दिले. ज्यात ‘ फलटणचे राजे अन् प्रल्हादराव’ एकाच स्टेजवर मस्तपैकी गप्पा मारत बसल्याचं स्पष्ट दिसत होतं.‘राजेंचं राजकारण काही आपल्या डोक्यात शिरत नाही बुवा ऽऽ !’ असं म्हणत पोस्टमन मोगराळे घाटातनं वर माणदेशात आला. बोराटवाडीतल्या बंगल्याची बेल दाबली. आतमध्ये ‘बंधाऱ्याचा पैसा कसा पचनी पाडावा?’ हे चार वर्षांपूर्वी छापलेलं पुस्तक फाडून आता ‘बंधाऱ्याचा पैसा कसा उघडा पाडावा?’ हे नवीन पुस्तक लिहिण्यात आतली मंडळी मग्न होती. दार उघडल्यानंतर समोर ‘जयाभाव’ उभे ठाकताच पोस्टमननं तो खलिता त्यांच्या हातात दिला. निरोप वाचताच ‘भाव’ सटकले. चिडले. त्यांनी आदळआपट सुरू केली. ‘एकवेळ दोन साडू एकत्र येतील, पण या जन्मी दोन बंधू एक होणे शक्य नाही!’ असं स्पष्ट करत ‘जयाभाव’नी लगेच तावातावानं ‘खटावच्या अवी’ ला कॉल लावला. फोनवरच ‘आम्ही दोघे भाऊ कधी एक होणार नाही!’ अशा निर्धाराची प्रेसनोटही तयार करायला लावली. तेव्हा ‘अवी’नंही झटक्यात बातमी तयार करताना हळूच एक विचारलं, ‘बारामतीकरांचा एक व्हा, हा निरोप तुम्हा बंधूंसाठी नव्हे, तर घड्याळ अन् हातवाल्यांसाठी असावा. जरा नीट चेक करता का भाऊ?’ हे ऐकताच जयाभाव रिलॅक्स झाले. ‘अवी’च्या कानमंत्रावर खुदकन् हसले. ‘असे चांगले सल्लागार आपल्याला गावोगावी का मिळत नाहीत?’ असा विचार करत पोस्टमनला म्हणाले, ‘तस्सा निरोप होता म्हणून अगोदरच सांगायचं नाही का? पण एक बोलू का.. आॅलरेडी मी आतून काही घड्याळवाल्यांसोबत आहेच रेऽऽ. वाटल्यास साताऱ्याच्या मोठ्या राजेंना किंवा देसार्इंच्या अनिलरावांना विचार. धरूंना इकडं-तिकडं पळू न देणं, हाही त्याचाच एक भाग बरं का.’ हे ऐकताच पोस्टमननं कोपऱ्यापासून दोन्ही हात जोडले, ‘मानलं जयाभाव तुम्हाला; एकाच दगडात तीन-तीन पक्षी मारताय. एकीकडं अधिकाऱ्यांवर होल्ड निर्माण करताना दुसरीकडं बँकेतल्या दोन राजेंना त्रास देऊन तिसऱ्या राजेंची इच्छा पूर्ण करताय.. अन् सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकाळेंच्या स्वप्नपूर्तीलाही हातभार लावताय.’ ही स्तुती ऐकून जयाभाव खूश झाले; पण गंभीरपणे मान हलवत पुटपुटले, ‘तरीही धरूंना पळविणं अवघड आहे रेऽऽ. कारण ते बॅँकेत सर्वांनाच धरून असतात!’ असं म्हणत पोस्टमनला ‘खुशी’ देऊ लागले. ‘आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला खूश करणं,’ अशी भन्नाट स्पर्धा या दोन भावांमध्ये सुरू असल्याचं पोस्टमन ऐकून होता. मात्र, ही ईर्षा दोघांच्या नसानसात एवढी भिनलीय, हे माहीत नव्हतं.पोस्टमन विचार करत-करत मायणीत आला. ‘गुदगे’वाड्यात ‘सुरेंद्ररावां’च्या हातात तो खलिता टेकविताच तेही ‘जयाभाव’प्रमाणं संतापले, ‘कोण म्हटलं आम्ही एक नाही? भले माझा छोटा भाऊ ‘शेखर’ बनू लागलाय, तरीही मी कधीतरी सकाळी पृथ्वीराजबाबांशी जुन्या निधीबाबत फोनवर चर्चा करतो. दुपारी मायणीच्याच डॉक्टरांना भेटतो. त्यांचं नव्या पक्षात नेमकं स्थान काय?, यावर गप्पा मारतो. ‘भैय्या अन् जयाभाव यांना कसा शह द्यायचा,’ यावर संध्याकाळी प्रभाकररावांशी चर्चा करतो.’ हे ऐकताच पोस्टमन पुरता गार. एकाचवेळी अनेकांशी राजकीय संबंध ठेवणारा हा ‘गुदगे’वाडा तरीही मागं का पडला, याचं कोडं काही त्याला सुटलं नाही. कदाचित ‘प्रश्नातच उत्तर’ दडलं असेल, असा विचार करत तो कऱ्हाडकडं निघाला. वाटेत मसूरजवळ कारखान्याच्या गाडीत बसून ‘पाटील’ निघाले होते. त्यांच्याही हातात खलिता दिल्यावर ते उद्गारले, ‘यात विशेष काय? आम्ही तर पूर्वीपासूनच एक आहोत. गेल्यावर्षी अचानक हातातून घड्याळ बाजूला काढलं गेलं होतं, तेव्हाही मी फक्त बाबांचंच ऐकत होतो. बाबा म्हणतील तसं ‘उत्तर’ देत होतो. बाबा बोलतील तसं ‘दक्षिण’ म्हणत होतो.’ हे ऐकताना पोस्टमन हळूच हसला; कारण ‘एकीचा फायदा!’ सांगणाऱ्या या पाटलांना कऱ्हाडकरांनी बाजार समितीमध्ये मात्र दणका दिला होता. पोस्टमन शेवटी साताऱ्यात पोहोचला. ‘खालचा वाडा’ अन् ‘वरचा वाडा’ या दोन्हीही ठिकाणी त्यानं खलिते पोहोच केले. इथं दोन्ही राजेंनी एकसुरात सांगितलं की, ‘आम्ही एकच आहोत. वाटल्यास पालिकेत बघ. ओन्ली वन राजे... बाकी सब पक्ष झूठ!’ हे ऐकताच पोस्टमन पुरता भारावला. तो मोठ्या कौतुकानं पालिकेत गेला. तिथं ‘बनकरांचे दत्ता’ भेटले. गोडोली तळ्यानंतर आता वायसी कॉलेजच्या समोरील ‘मोकळ्या जागेचा प्रोजेक्ट’ त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे तरळत होता. मात्र, त्याचवेळी ‘कदमांचे अवी’ अन् ‘चव्हाणांचे जयेंद्र’ बनकरांना कसं रोखता येईल, याचा विचार करत होते, हे पाहताच पोस्टमन चाट पडला; परंतु बनकरांच्या मुद्द्यावरून का होईना हे दोघे ‘एक झाले,’ हे ओळखताच मिश्किल हसला!
--सचिन जवळकोटे--
.