बास्केट ब्रिजला निधीच नसताना महाडिकांकडून धुळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:18 PM2021-08-05T18:18:33+5:302021-08-05T18:24:07+5:30
Politics ShivSena Bjp Kolhapur : बास्केट ब्रिजला निधीच मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लेखी पत्र खासदार संजय मंडलिक यांना दिले आहे. त्यामुळे या पुलासाठी निधी मिळाला आणि राज्य सरकारने पुढे काहीच केले नाही हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा आहे.
कोल्हापूर : बास्केट ब्रिजला निधीच मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लेखी पत्र खासदार संजय मंडलिक यांना दिले आहे. त्यामुळे या पुलासाठी निधी मिळाला आणि राज्य सरकारने पुढे काहीच केले नाही हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा आहे.
याच विषयावरून माजी खासदार धनंजय महाडिक धुळफेक करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी केला आहे.
फडणवीस यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात या बास्केट ब्रीजची गरज आणि केंद्र सरकारने निधी देवूनही राज्य सरकारने पुढे काहीच केले नाही असा आरोप केला होता. यानंतर मंडलिक यांनी संबंधित कार्यालयांशी पत्रव्यवहार केल्यानंतर असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे असे देवणे, पवार यांनी सांगतिले.
देवणे म्हणाले, एवढी कोल्हापूरची फडणवीस यांना काळजी होती तर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पूल का केले नाहीत. केंद्र शासनाने या पुलासाठी कोणताह निधी दिला नसताना फडणवीस यांनी तसे का जाहीर केले याचा खुलासा पहिल्यांदा त्यांनी करावा.
पवार म्हणाले, भाजपच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात काहीही नवीन झाले नाही. निव्वळ थापा मारणाऱ्यांचा हा पक्ष आहे. पुन्हा फडणवीस कोल्हापूरला येतील तेव्हा त्यांना शिरोलीलाच रोखून बास्केट ब्रीजबाबत विचारणा करणार आहोत. कोल्हापूरची जनता यांना माफ करणार नाही.