दाट धुक्यात शहर गुडूप; वाहतूक ठप्प

By admin | Published: February 13, 2016 12:38 AM2016-02-13T00:38:52+5:302016-02-13T00:39:22+5:30

जनजीवनावर परिणाम : किरकोळ अपघात; सकाळी साडेदहापर्यंत धुके; रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

Dusty city in Gudup; Traffic jam | दाट धुक्यात शहर गुडूप; वाहतूक ठप्प

दाट धुक्यात शहर गुडूप; वाहतूक ठप्प

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांची शुक्रवारची पहाट उजाडली ती दाट धुक्याची चादर बाजूला सारतच. एरव्ही साधारणपणे आठच्या सुमारास गडप होणाऱ्या धुक्याने शुक्रवारी मात्र साधारणपणे साडेदहापर्यंत शहर गुडूप केले होते. विशेषत: पंचगंगा नदी काठच्या पट्ट्यात धुक्याची तीव्रता अधिक असल्याने एक फूट अंतरावरीलही दिसत नव्हते त्यामुळे वाहनधारक हेडलाईट लावूनच प्रवास करत होते. पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूकही धिम्यागतीने सुरु होती.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळ्यातील वातावरण चांगले राहिले आहे. मागील वर्षी प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ऋतुमानच बदलल्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला होता. यंदा पाऊस कमी पडला असला तरी आॅक्टोबरनंतर हवामान स्वच्छ राहिले आहे. थंडी कमी राहिली असली तरी त्यात सातत्य राहिल्याने पिकांना पोषक ठरले. चांगल्या वातावरणामुळे फळे, भाजीपाला जोमात आहेत पण गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. ढगाळ हवामानाबरोबरच गार वारे वाहत असल्याने दिवसभर अंगातून थंडी जात नाही. शुक्रवारी पहाटेपासून दाट धुके व अंगाला बोचणारे वारे वाहत होते. धुके इतके दाट होते अक्षरश: पांघरुण घातल्यासारखे वातावरण होते. सकाळी दहावाजेपर्यंत हे दाट धुके होते. दहानंतर हळूहळू सूर्यनारायणाचे दर्शन झाले, तरीही दिवसभर हवेत कमालीचा गारवा जाणवत होता.
गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात घसरण झाली असून कमाल २९ डिग्री तर किमान १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. आगामी दोन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्यावर परिणाम झालाच पण त्याबरोबर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांचा भरणा सध्या दवाखान्यांत दिसत आहे.

कारची टोल नाक्यास धडक
कसबा बावडा : पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा... चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा...असे वातावरण कसबा बावडा आणि परिसरातील लोकांनी अनुभवले. पहाटे फिरावयास जाणाऱ्यांनी हातातील टॉर्चच्या उजेडात ‘मॉर्निंग वॉक’ पूर्ण केला. सकाळी दहा वाजेपर्यंत धुके कायम होते. दरम्यान, धुक्यात रस्ता न दिसल्यामुळे एका मारुती स्वीप्ट डिझायर गाडीने शिये टोल नाक्याला जोराची धकड दिली. त्यात चालक किरकोळ जखमी झाला. धुक्यामुळे पहाटेच्यावेळी राजाराम साखर कारखान्याकडे जाणारे ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने अगदी संथ गतीने जात होती. तर इतर वाहने हळूहळू हॉर्न वाजवत पुढे सरकत होती. या धुक्यात गारव्याची लाट पसरल्याने फिरावयास जाणाऱ्यांनी स्वेटर, कानटोपी, मफलरचा आधार घेतला.


कोल्हापुरातील तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये :
वारकिमानकमाल
शुक्रवार१५२९
शनिवार१६३१
रविवार१७३१
सोमवार१८३३

Web Title: Dusty city in Gudup; Traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.