यवलूज ,पडळ, माजगाव परिसरात धूळवाफ भात पेरणी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:35+5:302021-05-29T04:18:35+5:30
कासारी नदीला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात शेतकरी प्रामुख्याने ऊस शेतीच करतात. तसेच भात, सूर्यफूल, मका, भुईमूग व ...
कासारी नदीला बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात शेतकरी प्रामुख्याने ऊस शेतीच करतात. तसेच भात, सूर्यफूल, मका, भुईमूग व भाजीपाल्याचे पीक घेतात. सूर्यफूल, भुईमूग व मका पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा या परिसरात वळीव पाऊस चांगला झाल्याने ऊस भरणीची काम अंतिम टप्प्यात असून उसाचे पीक जोमात आले आहे. आडसाली ऊस लागणीसाठी सरी सोडायची धांदल सुरू आहे. मशागत करून शेतकरी कुरीच्या साह्याने धुळवाफ पेरण्या करत आहेत. शेतकऱ्यांची पारंपरिक बियाणे ऐवजी संकरीत वाणाच्या जास्ती उत्पादन देणाऱ्या विविध भात बियाण्यांच्या पेरणीकडे कल दिला आहे. बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राकडे धावपळ करावी लागत असून कोरोना महामारीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. मशागतीसाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. ट्रॅक्टर व पावर टिलरचा वापर वाढला आहे. जेथे पाण्याची सोय आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी भात पेरणी करून पाणी दिले आहे. माॅन्सून आगमनाची शक्यता गृहीत धरून खरिपाच्या कामासाठी यवलूज पंचक्रोशीतील शिवार माणसांनी फुलली आहेत. या महिनाअखेर धूळवाफ भात पेरणी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
फोटो ओळ:- माजगाव परिसरात कुरीच्या साह्याने धूळवाफ भात पेरणी करताना शेतकरी.