पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:44+5:302021-05-30T04:20:44+5:30
* आतापर्यंत १६ हजार जणांचे घेतले स्वॅब संदीप बावचे : शिरोळ कोरोनामुळे चालती-बोलती अनेक माणसे कायमची निघून गेली. त्यामुळे ...
* आतापर्यंत १६ हजार जणांचे घेतले स्वॅब
संदीप बावचे : शिरोळ
कोरोनामुळे चालती-बोलती अनेक माणसे कायमची निघून गेली. त्यामुळे संसर्गाची भीती येथे प्रत्येकाला आहे. अशा भयग्रस्त परिस्थितीत पॉझिटिव्ह दृष्टी ठेवत तब्बल दहा कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. तब्बल सोळा हजार रुग्णांना प्रत्येक स्पर्श करत त्यांच्या नाकातोंडातून स्वॅब घेण्याचे काम केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्वॅब संकलन केंद्राच्या माध्यमातून हे कर्मचारी काम करीत आहेत.
एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शिरोळ तालुक्यात वाढला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्षम झाली. आगर, दानोळी, नांदणी, शिरोळ, दत्तवाड या पाच ठिकाणी स्वॅब संकलन केंद्रे सुरू करण्यात आली. तर नृसिंहवाडी, जयसिंगपूर, अब्दुललाट, घालवाड याठिकाणी अॅंटिजन तपासणी केली जात आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रिझवान पटेल, गजानन पुकाळे, स्वाती बिरनाळे, रुपाली हासूरे, मनोज मेथे, आमणे हे सहाजण स्वॅब घेण्याच्या कामात व्यस्त आहेत. तर अॅंटिजन तपासणीसाठी भीम बोरगांवे, दीपाली शेटे, अमित काटकर व डोंगळे कार्यरत आहेत.
तालुक्यात जवळपास सोळा हजाराहून अधिक जणांचे स्वॅब आतापर्यंत घेण्यात आले आहेत. वेळीच तपासणी, निदान व उपचारामुळे अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. स्वॅब घेण्याचे कर्तव्य बजावणाऱ्यांना आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे कर्मचारी अगदी काळजीपूर्वक स्वॅब घेतात. कोरोनासारख्या भयग्रस्त परिस्थितीत पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून कोरोना योध्दा म्हणून काम करणारे हे कर्मचारी निश्चितच लढवय्ये ठरले आहेत. त्यांना आरोग्य विभागाचेही तितकेच बळ मिळत आहे.
-------------------------
कोट - शिरोळ तालुक्यात पाच ठिकाणी स्वॅब संकलन केंद्रे तर चार ठिकाणी अॅंटिजन तपासणी केली जात आहे. दहा कर्मचारी याठिकाणी सतत काम करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. शासन नियमांचे पालन करावे.
- डॉ. प्रसाद दातार, तालुका वैद्यकीय अधिकारी