‘दत्त’ गाळप क्षमता वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:36+5:302021-01-01T04:17:36+5:30
शिरोळ : कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता लक्षात घेऊन कारखान्याने पहिल्या टप्प्यात गाळप क्षमता प्रतिटन ९ हजारवरुन १२ हजार मे. ...
शिरोळ : कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता लक्षात घेऊन कारखान्याने पहिल्या टप्प्यात गाळप क्षमता प्रतिटन ९ हजारवरुन १२ हजार मे. टन इतकी वाढविण्याबरोबरच डिस्टिलरी व इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापन विचाराधीन आहे. यासाठी ३३० कोटी भांडवली गुंतवणूकदेखील अपेक्षित असून, कारखान्याच्या व डिस्टिलरीच्या विस्तारिकरणामुळे कारखान्यास व सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५१ वी वार्षिक सभा झाली. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. कोरोनाचे नियम पाळत खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली. दरम्यान, चॅरिटेबल ट्रस्टच्या तेराव्या वार्षिक सभेचे विषयही मंजूर करण्यात आले.
अध्यक्ष पाटील म्हणाले, ऊस विकास योजनेमुळे एकरी उत्पादकता वाढली आहे. क्षारमुक्त जमीन प्रकल्पामुळे कार्यक्षेत्रातील ऊस पिकाखाली येत असून, कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे पंधरा हजार हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी नोंदविले जाते. त्यामुळे १५ लाख ५० हजार मे. टन गाळपासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळेच गाळप क्षमता वाढविण्याचा विचार असून, विस्तारिकरणाचे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
सभेस उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, संचालक विनया घोरपडे, अनिलकुमार यादव, शेखर पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, महेंद्र बागे, विश्वनाथ माने, निजामसाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, अमर यादव, आण्णासाहेब पाटील, रघुनाथ पाटील, संगीता पाटील-कोथळीकर, यशोदा कोळी यांच्यासह संचालक, सभासद, कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
फोटो ३११२२०२०-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.