ड्युटी रस्त्यावर..कोरोनाच्या भीतीने काळजात होते चर्रर्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:31+5:302021-05-21T04:25:31+5:30
कोल्हापूर : कोरोना महामारीत शहरवासीयांच्या संरक्षणासाठी आपण काही करतोय याचं समाधान असतंच.. पण आपल्यामुळे लहान मुलांना, कुटुंबीयांना काही धोका ...
कोल्हापूर : कोरोना महामारीत शहरवासीयांच्या संरक्षणासाठी आपण काही करतोय याचं समाधान असतंच.. पण आपल्यामुळे लहान मुलांना, कुटुंबीयांना काही धोका होऊ नये याची सतत चिंता असते.. मूल १२-१२ तास आईपासून दूर राहतं..अनेकदा तर ड्युटी संपवून घरी जाईपर्यंत ते झोपी जातात.. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती नसले तर मूल सांभाळायचीही अडचण होते. अशावेळी आईकडे किंवा जवळच्या नातेवाइकांचा आधार घ्यावा लागतो अशाही परिस्थितीत महिला पोलीस शहरवासीयांच्या सुरक्षिततेखाली रात्रं-दिवस आपली सेवा बजावत आहेत.
कोरोना संसर्ग काळात नागरिकांना घरी बसायला लावण्यासाठी पोलीस रस्त्यावर आले आहेत. कोल्हापूरकरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून ते १२ तास सेवा बजावत आहेत. चौकाचौकात उभे राहून शहरात फिरत असलेल्या नागरिकांना कारण विचारणे, विनाकारण फिरत असले तर कारवाई, चौकशी करणे ही जबाबदारी पोलीस निभावत असून, त्यात महिला पोलिसांचाही तितकाच सहभाग आहे. एकीकडे घर, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना ड्युटीवर येताना त्यांच्यावर अधिक ताण येतो. सकाळी नऊच्या आधी घरातील सगळी कामं लहान मुलांचं आटोपून ड्युटीवर यायचे, इथे बारा तास काम केल्यानंतर घरी गेलो की मूल आईच्या ओढीने झेपावते, पण संसर्गाच्या भीतीने बाळाला जवळही घेता येत नाही अशी मानसिक घालमेल असते. या सगळ्यावर मात करीत महिला पोलीस, वाहतूक पोलीस आपली सेवा बजावत आहेत.
--
वेळ वाढविली...
मागच्या वेळी पोलिसांची ड्युटी तीन शिफ्टमध्ये करण्यात आली होती. पूर्वी सकाळी ७ ते ३, दुपारी ३ ते रात्री ११, ११ ते सकाळी ७ अशा तीन वेळांमध्ये पोलीस ड्युटी करीत होते. आता ही वेळ १२ तासांवर आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते सकाळी ९ असे बारा तास एकाच पॉईंटवर ड्युटी करताना पोलिसांवर ताण येतो.
--
मी व पती दोघेही पोलीस आहोत, पतीची ड्युटी इचलकरंजीला आहे. आम्हाला एक वर्षाची मुलगी आहे, घरात मोठे कोण नसल्याने रोज बाळाला आईकडे सोडून येते. दिवसभर ती राहते, पण संध्याकाळ झाली की किरकिरायला सुरुवात होते. घरी जाईपर्यंत काही वेळा झोपी जाते. आमच्यामुळे तिला कोणता धोका होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेतो, पण तरीही चिंता वाटतेच.
रेश्मा शेटके
महिला पोलीस
--
नागरिकांसाठी आपण काही करतो याचे समाधान खाकी वर्दी घातल्यावर असतेच, पण त्याचवेळी कुटुंबासाठी घालमेल होते. आम्हाला दोन वर्षांचा मुलगा आहे. दिवसभर आम्ही रस्त्यावर असतो. संसर्गाची भीती असल्याने घरीदेखील जात नाही, पूर्वी साधी सर्दी, खोकला झाला की दुर्लक्ष केले जायचे. आता अशी काही लक्षणे जाणवली की पोटात भीतीचा गोळा उठतो.
प्रियांका कडवकर
महिला पोलीस
--
फोटो नं २००५२०२१-कोल-महिला पोलीस०१, ०२
ओळ : कोल्हापुरातील वाशी नाका येथे गुरुवारी रात्री महिला पोलीस आपली सेवा बजावत होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
(कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण पोलीस व त्यातील महिला पोलिसांची सांखिकी माहिती पाठवत आहे.)