डवरी समाजाचा अकराव्या दिवशी ठिय्या

By admin | Published: February 11, 2015 11:49 PM2015-02-11T23:49:13+5:302015-02-12T00:22:40+5:30

धरणे आंदोलन : अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी

Dwari community stance on the eleventh day | डवरी समाजाचा अकराव्या दिवशी ठिय्या

डवरी समाजाचा अकराव्या दिवशी ठिय्या

Next

कोल्हापूर : सायबर चौकाजवळील डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यामुळे बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अतिक्रमण काढून डवरी समाजाला जागेचा ताबा देणे शक्य होण्याची चिन्हे नाही. त्यामुळे अकरा कुटुंबीयांसमवेत सुरू असलेले बेमुदत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. अतिक्रमण हटवून जागेचा ताबा दिल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार केलेल्या डवरी समाजातील १०० हून अधिक कुटुंबांनी आपला संसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला आहे. गेले दहा दिवस ही सर्व कुटुंबे येथे ठिय्या मारून आहेत. बहुजन परिवर्तन पक्षप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे.
या धरणे आंदोलनाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन डवरी समाजाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली होती. त्यावेळी करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्याशी चर्चा करून १२ फेब्रुवारीला या जागेतील अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी चव्हाण तसेच खरमाटे यांची या अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळी ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे, त्या सातजणांपैकी चारजणांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळविली असल्याची बाब समोर आली. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल, असे डॉ. खरमाटे यांनी सांगितले.
सायबर चौकाजवळील सर्व्हे क्रमांक ४८७ ब येथील अठरा गुंठे जागा यशवंतनगर गृहनिर्माण संस्थेला सरकारने दिली आहे. त्यावेळी त्या जागेवर काही लोकांनी आधीच अतिक्रमण केले होते. ही जागा मोकळी करून द्यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना १९८७ मध्ये दिले होते; परंतु तेव्हापासून कोणीही दखल घेतली नाही. परंतु, आता समाजालाच तेथून उठविण्याचा घाट घातला जात असल्याची आंदोलकांची तक्रार आहे.

Web Title: Dwari community stance on the eleventh day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.