निवासस्थानांची दुरवस्था; पोलीस ठाण्याची इमारतही अपुरी

By admin | Published: December 3, 2015 09:37 PM2015-12-03T21:37:25+5:302015-12-03T23:49:01+5:30

मोजक्याच कर्मचाऱ्यांचे वास्तव्य : बाकी भाडोत्री घरांत; साडेचार एकर प्रशस्त जागा असूनही सुसज्ज इमारतीअभावी निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

Dwelling of residences; The police station building too inadequate | निवासस्थानांची दुरवस्था; पोलीस ठाण्याची इमारतही अपुरी

निवासस्थानांची दुरवस्था; पोलीस ठाण्याची इमारतही अपुरी

Next

अशोक खाडे / सुहास जाधव -- पेठवडगाव
पेठवडगाव पोलीस ठाणे इमारतीच्या आवारात पाठीमागील बाजूस सुमारे ४५ वर्षांपूर्वी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे बांधकाम जीर्ण होत आले आहे. येथील १४ पैकी ११ निवासस्थाने बऱ्यापैकी सुस्थितीत असली, तरी अगदी मोजकेच कर्मचारी याठिकाणी वास्तव्य करतात, तर अनेकजणांना पर्यायाने भाड्याच्या घराचा आश्रय घ्यावा लागला आहे. शिवाय ठाण्याची इमारतही कामकाजासाठी अपुरी पडू लागली आहे.वडगाव पोलीस ठाण्याकडे तीन पोलीस अधिकाऱ्यांसह ४३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात असणाऱ्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे. काही निवासस्थानांना गळती लागली आहे. इमारतींंचा स्लॅब जीर्ण झाल्यामुळे स्लॅबचे ढपले पडू लागले आहेत. तीन निवासस्थाने तर धोकादायक बनल्याने कधीही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. मुळातच जीर्णावस्थेकडे झुकलेली निवासस्थाने डागडुजी व रंगरंगोटीअभावी भकास वाटू लागली आहेत. अशा अवस्थेतील निवासस्थानांत काही कर्मचारी निवास करतात, तर अनेकजण आर्थिक भुर्दंड सोसून भाड्याच्या घरात राहत आहेत. याशिवाय निवासस्थाने व ठाणे इमारतीच्या आंतर्बाह्य शौचालय, पाण्याची सुविधा तोकडी आहे.पोलीस ठाण्याची इमारत कामकाजाच्या सोयीच्यादृष्टीने अपुरी पडू लागली आहे. इमारती अंतर्गत सर्व खोल्या जेमतेम आकाराच्या असल्याने पोलीस दाटीवाटीतच नित्य कामकाज उरकताना पाहायला मिळते. ठाण्याच्या आत-बाहेर बैठक व्यवस्था पुरेशी नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. बाजारपेठेत असणारी चार निवासस्थाने सुस्थितीत आहेत. मात्र, इथल्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असते. येथील निवासस्थान परिसरात स्वच्छतागृहांची कमतरता आहे. (उत्तरार्ध)


अपुऱ्या पोलीस बळामुळे असो अथवा कसे, मात्र पेठवडगाव पोलिसांकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होत नाही. अपुरे पोलीस बळ तसेच पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. आपण वारंवार या प्रश्नी विधानसभेत हा विषय लावून धरला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनातही या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री तसेच गृहराज्यमंत्री शिंदे यांच्याकडे आग्रह धरणार आहे. नवीन पोलीस भरतीनंतर प्रथम येथील पोलिसांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ताकद लावू.
- डॉ. सुजित मिणचेकर, आमदार


प्राप्त परिस्थितीत सक्षमपणे काम करीत आहोत. शिवाय परिसरातील ड्रेनेज व स्वच्छतेच्या उपाययोजनांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. गैरसोयी दूर करण्याबरोबरच टप्प्याटप्प्याने पोलीस ठाण्याच्या परिसराचे सुशोेभीकरण व नवीन कक्षाच्या बांधकामासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक, पेठवडगाव पोलीस ठाणे.

Web Title: Dwelling of residences; The police station building too inadequate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.