जिल्ह्यातील १३८ शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’

By admin | Published: January 6, 2015 11:39 PM2015-01-06T23:39:53+5:302015-01-07T00:07:48+5:30

दोन शाळांची निवड : कृतियुक्त अध्ययन कार्यक्रमअंतर्गत कार्यशाळा

E-learning in 138 schools in the district | जिल्ह्यातील १३८ शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’

जिल्ह्यातील १३८ शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’

Next

कोल्हापूर : सर्वांसाठी शिक्षण हे ध्येय समोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कृतियुक्त अध्ययन कार्यक्रम (एबीएल) हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १३८ शाळांची निवड करण्यात आली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांमध्ये या कार्यक्रमांतर्गत ‘ई-लर्निंग’चे धडे दिले जाणार आहेत. जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यशाळेत या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
ताराबाई पार्क येथील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील होत्या. प्रमुख उपस्थिती शिक्षणतज्ज्ञ जे. के. पाटील (पुणे), जि. प. उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील, जि. प. सदस्य शहाजी पाटील, महेश पाटील, राहुल देसाई, आदींची होती.
जि. प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी ई-लर्निंग पद्धती उपयुक्त असून, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघातून दोन शाळांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांचा यामध्ये समावेश असेल.
शिक्षणतज्ज्ञ पाटील यांनी स्क्रिनद्वारे सादरीकरण करून उपस्थितांना या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामीण भागात बहुवर्ग अध्यापन पद्धती ही अतिशय कठीण बाब झालेली आहे. तमिळनाडूमध्ये ७५ टक्के प्राथमिक शाळा आपल्याचसारख्या परिस्थितीला तोंड देत होत्या. ही परिस्थिती बदलण्याकरिता अनेक शासकीय धोरणांनुसार प्रकल्प हाती घेऊन शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. तरीही त्याची अपेक्षित परिणामकारकता दिसून आली नाही. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा व माहितीचा उपयोग प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात केला गेला नाही. त्याचा परिणाम म्हणून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता कृतियुक्त अध्ययन कार्यक्रम (अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्रोग्राम) उदयास आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, बाजीराव पाटील, सुरेश कांबळे, प्रा. देवानंद कांबळे, भाग्यश्री पाटील, मेघाराणी जाधव, आकांक्षा पाटील, आदींसह सर्व पंचायत समित्यांचे सभापती उपस्थित होते. (प्रतिनिधी)

एबीएल म्हणजे काय?
एबीएल म्हणजे कृतीद्वारे शैक्षणिक क्षमतेची संपादणूक होणारी तांत्रिक पद्धत आहे. ज्ञानेंद्रियांद्वारे जे ज्ञान आपण मिळवितो, ते कालांतराने विसरू शकतो; परंतु जे आपण स्वत: कृतीद्वारे शिकतो, ते कायमस्वरूपी मनात पक्के राहते.

Web Title: E-learning in 138 schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.