कोल्हापुरातही ‘ई-मेल स्पुफिंग’
By Admin | Published: January 9, 2016 12:15 AM2016-01-09T00:15:27+5:302016-01-09T00:52:44+5:30
हॅकर्सचा डाव फसला : उद्योजकाच्या दक्षतेमुळे मोठी फसवणूक टळली; सावधानता बाळगणे गरजेचे
विश्वास पाटील -- कोल्हापूर -आॅनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार रोज उघडकीस येत असताना गुरुवारी कोल्हापुरातील एका उद्योजकाचा ई-मेल हॅक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. सायबर क्राईममध्ये त्यास ‘ई-मेल स्पुफिंग’ असे म्हटले जाते. सुदैवाने त्या उद्योजकाच्या चाणाक्षपणामुळे त्यांची फसवणूक होण्यापासून टळली; परंतु असा प्रकार कुणाच्याही बाबतीत घडू शकतो. त्यासाठी सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.
येथील इंडस्ट्रियल सुटे भाग तयार करणाऱ्या एका कंपनीचा माल देशात व देशाबाहेरही नियमितपणे पाठविला जातो. त्याची बिले व बाहेरच्या कंपनीकडून काही खरेदी केली असल्यास त्याचीही बिले संबंधित कंपनीच्या बँक खात्यावर जमा केली जातात. हा सर्व व्यवहार ई-मेलच्या आधारे केला जातो. पैसे जमा केल्यानंतर अमूक इतकी रक्कम तुमच्या खात्यावर अमूक या बिलापोटी जमा केली असल्याचे मेलवर कंपन्या कळवितात. त्याचाच आधार घेत या उद्योजकाचा ई-मेलचा हॅक झाला. त्यास कंपनीच्या नावे बनावट मेल पाठविण्यात आला व तुम्ही कंपनीच्या अमूक बँकेत ज्या खात्यावर पैसे पाठवत होता, त्याच्याऐवजी त्याच बँकेच्या नव्या खाते क्रमांकावर तुमचे पेमेंट करावे, असे सांगण्यात आले. या उद्योजकाला कंपनीने बँक तीच ठेवून नुसते खाते का बदलले असावे, अशी शंका आली. त्यांनी सहज म्हणून संबंधित कंपनीस फोन करून त्याची खातरजमा केली असता कंपनीने खाते बदलले नसल्याचे उघड झाले. त्यांनी त्यासंबंधी असा कोणताच मेल पाठविला नसल्याचेही सांगितले. त्यावर हे उद्योजक चांगलेच अवाक् झाले. त्यांनी थोडीशी सहज चौकशी करायची म्हणून कंपनीस फोन केला म्हणून त्यांची मोठ्या रकमेची फसवणूक टाळता आली.
याबाबत शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘असे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. पुरेशी दक्षता बाळगणे हेच त्यासाठी जास्त उपयुक्त ठरत आहे. विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थिनी वैष्णवी पवार हिने सायबर क्राईमसंबंधी पीएच.डी. केली आहे. त्यांच्या अभ्यासामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारास सायबर क्राईमध्ये ‘ई-मेल स्पुफिंग’ असे म्हटले जाते. तुमच्या ई-मेल आयडीसारखाच आयडी तयार करून असे प्रकार केले जातात.
अशा घटनांपासून फसवणूक टाळण्यासाठी हे करा..
तुमच्या ई-मेलचा पासवर्ड वारवार बदला
पासवर्ड अल्फा-न्यूमरिकल (अक्षरे व संख्या) करा.
पासवर्ड करताना त्यामध्ये कोलन, जास्त स्पेसचा वापर करा. अशा पासवर्ड ना संगणकीय भाषेत स्ट्राँग पासवर्ड म्हणून ओळखले जाते.
अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा जी-मेलला सायबर सिक्युरिटी जास्त असल्याने जी-मेलचा वापर शक्यतो करा.
तुमच्या बाबतीत अशाप्रकारे फसवणुकीचा प्रकार घडल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलला त्याची माहिती द्या म्हणजे अशा फसवणुकीची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होईल.
आपण ज्या कंपनीशी व्यवहार करतो, त्यांच्याबाबतीत ई-मेल, संपर्क क्रमांक अथवा अन्य काहीही बदल झाल्यास एक फोन करून त्याबद्दलची खात्री करा. एक फोन तुमची एक फसवणूक टाळू शकतो.