ई-पास रद्द, जोतिबाच्या खेट्याला भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:36 PM2022-03-14T12:36:03+5:302022-03-14T12:37:24+5:30
शनिवारपासून प्रशासनाने ई-पास दर्शन व्यवस्था बंद केली असून, दर्शनासाठी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो भाविकांनी देव दर्शनाचा लाभ घेतला.
जोतिबा : चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात भाविकांनी जोतिबांचे दर्शन घेतले. जोतिबाच्या खेटे यात्रेचा चौथा रविवार होता. शनिवारपासून प्रशासनाने ई-पास दर्शन व्यवस्था बंद केली असून, दर्शनासाठी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो भाविकांनी देव दर्शनाचा लाभ घेतला. गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत चांगभलंच्या गजरात दोन लाखांहून अधिक भाविकांनी जोतिबा दर्शनाचा लाभ घेतला. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात होते.
पहाटे चार वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती, तसेच इतर नित्य धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाले. चौथा खेट्यानिमित्त श्री जोतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली. लाखो भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
चौथ्या खेट्याच्या दिवशी ई-पास दर्शन व्यवस्था बंद केल्यामुळे भाविकांनी जोतिबा डोंगरावर प्रचंड गर्दी केली होती. बदललेल्या नवीन नियमानुसार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पन्हाळचे तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी मंदिरातील दर्शन रांगेची पाहणी करून काही सूचना व उपाय सांगितले.
भाविकांनी जोतिबाला नैवेद्य दाखवून दर्शनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री पालखी सोहळा झाला. आजच्या चौथा खेट्यालाही घोड्याविना धुपारती, पालखी सोहळा झाला. कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.