प्रतिवर्षी पाच हजार जणांना कर्ज देणार
By admin | Published: October 17, 2016 01:07 AM2016-10-17T01:07:59+5:302016-10-17T01:07:59+5:30
अण्णासाहेब पाटील महामंडळ : सरकार भरणार व्याज
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रतिवर्षी पाच हजार युवकांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. त्याचे व्याजही सरकार भरेल. तसेच या कर्जप्रकरणासाठी असलेली किचकट कागदपत्रांची प्रक्रियाही सुलभ करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने १३ आणि १४ आॅक्टोबरच्या अंकामध्ये या महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयातील कारभाराची वस्तुस्थिती दोन भागांमध्ये मांडली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यालयांचाही कारभार सुधारण्याबाबत तातडीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
या महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालय २२०२/२००३ पासून सुरू झाले. गेल्या चौदा वर्षांत या मंडळाकडून केवळ चौघांना व्यवसायासाठी बीज भांडवल मंजूर झाले. या प्रकरणांसाठी एवढी कागदपत्रे जोडावी लागतात की, ती यादी पाहूनच कर्ज घेणारा इच्छुक घामाघूम होतो, हे वास्तव ‘लोकमत’ने सविस्तरपणे मांडले होते. तसेच इथल्या कर्मचाऱ्यांचीही मानसिकता उदासीनतेची राहिली आहे. कर्जाची विचारणा करणाऱ्याला बसायला सांगण्याचे सौजन्य तर नाहीच; परंतु आलेल्यांना एक माहितीपत्रक देऊन त्यांची इथे बोळवण केली जाते. हे सर्व वास्तव ‘लोकमत’ने दोन भागांमध्ये मांडले होते. याबद्दल ग्रामीण युवकांच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात आल्या होत्या. याची दखल घेत पालकमंत्री पाटील म्हणाले की, सरकारी कारभार म्हणून या महामंडळाच्या बाबतीत जे शैथिल्य आले आहे, ते तर दूर करणारच आहोत. कागदपत्रांमध्येही सुलभता आणली जाईल. तसेच या मंडळाला जो २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यातून प्रतिवर्षी पाच हजार तरुण-तरुणींना व्यवसायासाठी बीजभांडवल दिले जाईल व त्याचे व्याज सरकार भरणार आहे.