गलेलठ्ठ पगार, तरीही अपहाराची बुद्धी ?
By admin | Published: August 11, 2016 12:18 AM2016-08-11T00:18:48+5:302016-08-11T00:33:15+5:30
कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल संताप : जिल्हा बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह
कोल्हापूर : ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असूनही त्यांना अपहार करण्याची बुद्धी होतेच कशी?’ असा संतप्त सवाल बॅँकेचे ठेवीदार व ग्राहकांमधून केला जात आहे. दर तीन-चार महिन्यांतून असा एखादा प्रकार घडतच असल्याने बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शेतकरी, बचत गटाच्या महिला यांसह सामान्य ग्राहक जिल्हा बॅँकेशी संलग्न आहेत. ग्रामीण भागात खेडोपाडी शाखा असल्याने जिल्हा बॅँक ही सामान्य माणसाला आपली बॅँक वाटते; पण या बॅँकेत त्या पद्धतीने सेवा दिली जाते का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा बॅँकेसमोर खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे आव्हान आहे. खासगी बॅँका थेट ग्राहकांच्या दारात पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देणे गरजेचे असताना तसे होत नाही. उलट अपहार करून ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब बॅँकेच्या दृष्टीने ‘चिंते’ची तर संचालकांच्या दृष्टीने ‘चिंतना’ची आहे.
राज्यात कोणत्याही जिल्हा बॅँकेतील कर्मचाऱ्यांना पगार नाहीत, तेवढे पगार कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. येथे कर्मचाऱ्यांना २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पगार आहेत. तरीही या कर्मचाऱ्यांना बॅँकेत अपहार करण्याची बुद्धी सुचतेच कशी? गेल्या आठवड्यात राशिवडे (ता. राधानगरी) शाखेत एका कर्मचाऱ्याने दोन संस्थांनी भरावयास दिलेल्या रकमेचे चलन केले आणि ती परस्पर हडप केली. प्रथमदर्शनी तीन लाखांचा अपहार असला तरी बॅँकेतर्फे त्याची चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अपहाराचे अनेक प्रकार झाले आहेत; पण ते दडपण्याचे काम झाल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असूनही सामान्य माणसाच्या पैशांवर हात मारण्याची बुद्धी कर्मचाऱ्यांना होतेच कशी? बॅँक प्रशासनही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करून त्यावर पडदा टाकण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याने पुन:पुन्हा असे प्रकार होत आहेत. बॅँकेचे संचालक पाच हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बॅँकेकडे ठेवी या फक्त विश्वासावर येतात; पण असे अपहाराचे प्रकार होत असतील तर ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, याचे भान संचालकांनी व त्यांनी लाडावून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तरच अशा प्रवृत्तीला चाप बसेल. (प्रतिनिधी)