पृथ्वीच कधीतरी आपल्याला नष्ट करेल, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:41 PM2023-12-16T12:41:53+5:302023-12-16T12:43:04+5:30
कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी ...
कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी पृथ्वीच आपल्याला नष्ट करेल अशी वेळ आली आहे. विविध शास्त्रज्ञांनी शास्त्रीय अभ्यासातून हे दाहक चित्र स्पष्ट करूनही राजकीय नेते, लोकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना ते कसे कळत नाही? असा सवाल पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी शुक्रवारी उपस्थित केला.
शिवाजी विद्यापीठ व किर्लोस्कर उद्योग समूह यांच्यातर्फे आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना विद्यापीठ परिसर जलयुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या विज्ञान शिक्षणाच्या प्रचार-प्रसार कार्यासाठी वसुंधरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रमोद पाटील होते.
यावेळी देऊळगावकर यांनी सद्य पर्यावरणीय परिस्थितीची विस्तृत मांडणी केली. युरोपातील अनेक देशांमध्ये कलेच्या माध्यमातून पर्यावरणीय संकट मांडले जाते आणि ते अधिक प्रभावीपणे नव्या पिढीला भावते परंतु आपल्याकडे मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ.पी. एस. पाटील म्हणाले, वसुंधरा वाचली तरच आपले सर्वांचे अस्तित्व टिकणार आहे. त्यासाठी आज आणि आत्ताच प्रत्येकाला जागे होऊन कृतिशील होणे गरजेचे आहे. भविष्यात किर्लोस्कर उद्योग समूहासोबत अनेक उपक्रम हाती घेऊन ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
यावेळी किर्लोस्कर समूहाचे सी. जी. रानडे, धीरज जाधव, वीरेंद्र चित्राव, पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव उपस्थित होत्या. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद आजगेकर यांनी आभार मानले.
वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी
- सुहास वायंगणकर,
- व्ही. टी. पाटील फाउंडेशन
- जलमित्र फाउंडेशन, मजले
- गार्डन्स क्लब