कोटींच्या रस्त्यावर मातीचे पॅचवर्क!
By admin | Published: June 21, 2014 12:27 AM2014-06-21T00:27:23+5:302014-06-21T00:27:38+5:30
नगरोत्थान रस्त्यांचे काम खोळंबले : प्रकल्प पूर्ण होण्याआधीच रस्त्यांची चाळण
कोल्हापूर : शहरातील ३८ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १०८ कोटींचा निधी उपलब्ध असूनही गेली चार वर्षे अंतर्गत रस्त्यांचे काम रखडले आहे. ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ‘निविदा पे निविदा’ असा प्रकार सुरू आहे. काही वर्षांत केलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. ठेकेदारांवर कारवाई न करता महापालिकेने अनेक ठिकाणी माती टाकून पॅचवर्क करण्याचा उद्योग केल्याने नागरिकांतून संताप व्यक्तहोत आहे.
ठेकेदारांनी असमर्थता दर्शविल्यामुळे शहरातील अकरा रस्त्यांच्या कामांची चार भागांत विभागणी करून काढलेल्या फेरनिविदेकडेही त्यांनी पाठ फिरविली आहे. रस्त्यांच्या दर्जापेक्षा मला किती मिळाले, हा नियम लावला गेल्याने शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली. आता ठेकेदार मिळत नसल्याने निधी असूनही सुविधा न पुरविण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. पावसाळा सुरू होणार असल्याने प्रकल्प पुन्हा तीन ते चार महिन्यांसाठी रखडणार आहे. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाकडे ‘आंबा’ म्हणूनच पाहिले. रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिलेच नाही. वेळीच लक्ष दिले असते, तर प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. यापूर्वी केलेल्या रस्त्यांची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली आहे. नियमानुसार रस्त्यांची देखभाल ठेकेदाराने करणे अपेक्षित आहे. ठेकेदार व प्रशासन यांचे संगनमत असल्याने आजपर्यंत खराब रस्त्यांबाबत एकाही ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)