कोल्हापूर पूर्वपदाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:59 AM2019-08-12T00:59:25+5:302019-08-12T00:59:29+5:30

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट ...

To the east of Kolhapur | कोल्हापूर पूर्वपदाकडे

कोल्हापूर पूर्वपदाकडे

Next

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट पाणी असल्याने तो रविवारीही बंद राहीला. आज, सोमवारी पाणी पातळी कमी झाल्यावर महामार्ग सुरू होण्याची शक्यता असून, इंधनाची वाहने प्राधान्याने सोडली जाणार आहेत. शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर व कर्नाटकची हवाई पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. ‘गोकुळ’ दूध संघाने कोकणमार्गे मुंबईकडे दोन लाख लिटर दूध रवाना केले. आजअखेर पुरामुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील पूर ओसरू लागला असून, शहरासह आसपासच्या भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील गवत मंडई येथील पाणी ओसरल्याने येथून वाहतूक सुरू झाली. पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम गतीमान करण्यात आली आहे. त्याचबरोबर भुदरगड, गडहिंग्लज, कागल येथील काही मार्ग पाणी ओसरल्यामुळे सुरू झाले. गेले सहा दिवस महामार्ग बंद असल्याने ‘गोकुळ’चे टॅँकर मुंबईकडे गेले नसल्याने नुकसान झाले होते; त्यामुळे कोकणमार्गे रविवारी दोन लाख लिटर दूध टॅँकरद्वारे मुंबईला पाठविले. कोल्हापूर जिल्ह्यातील व कर्नाटकातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमानाद्वारे हवाई पाहणी करून आढावा घेतला. शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे. या ठिकाणी मदतकार्य गतीने वाढविण्यात आले असून, बोटींची संख्याही वाढविण्यात आली आहे. सकाळी २५ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले असून, ते शिरोळकडे पाठविण्यात आले. शिरोली येथे अजूनही तीन फूट पाणी असल्याने महामार्ग बंद राहिला; परंतु आपत्ती व्यवस्थापनात असलेल्या विमानांसह वाहनांसाठी इंधनाची तातडीची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दिवसभरात तीनवेळा पाहणी केली. यावेळी चाचणीद्वारे पोकलॅनच्या सहाय्याने इंधनाचे पाच टॅँकर व सिलिंडरचे एक वाहन शिरोलीतून कोल्हापुरात आणण्यात आले.
जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई
शहरात जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असून, त्यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्ग बंद असल्याने टंचाई दूर करण्यात अपयश येत आहे. पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, पिण्याचे पाणी याची मोठी टंचाई आहे. गॅस, भाजीपाला, पिण्याचे पाणी, वीज नाही; त्यामुळे हॉटेल व्यवसाय कसा सुरू करायचा, असा प्रश्न पडलेल्या व्यावसायिकांनी आपले व्यवसायच बंद ठेवले.
प्रशासनाचा कारभार ‘ढिम्म’च: उल्हास पाटील
कोयना धरण ८0 टक्के भरल्यानंतर ३१ जुलैला शिरोळ तालुक्याला महापुराचा धोका असल्याचा इशारा मी जिल्हाधिकारी यांना भेटून दिला होता. तसे लेखी पत्रही दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या परिस्थितीला प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार कारणीभूत आहे, असा आरोप आमदार उल्हास पाटील यांनी रविवारी केला. -

Web Title: To the east of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.